युवासेनेचा दणका, ‘विद्यासागर क्लासेस’च्या विद्यार्थ्यांना थकीत फी परत मिळाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

विद्यार्थ्यांची शिकवणी फी थकवलेल्या ‘विद्यासागर क्लासेस’ला युवासेनेने आज दणका दिला. शेकडो विद्यार्थ्यांना त्यांची फी परत करण्यास क्लासेसच्या संचालकांना भाग पाडले.

नीट, सीईटी अशा परीक्षा देणार्‍या तसेच अकरावी, बारावीत शिकणार्‍या हजारो विद्यार्थ्यांनी दादर येथील विद्यासागर क्लासेसमध्ये शिकवणी लावली होती. त्यासाठी वर्षाची आगाऊ फी त्यांनी भरली होती. पण गेल्या जानेवारी महिन्यापासून क्लासमधील वर्ग अचानक बंद करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी, पालक चिंताग्रस्त झाले. क्लासेसच्या सर्व 13 शाखांमधील विद्यार्थ्यांना हा अनुभव आला. क्लास बंद केला तर जानेवारीपासूनची फी परत द्या, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. परंतु संचालकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. याप्रसंगी युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य पवन जाधव, सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, शीतल शेठ-देवरुखकर, राजन कोळंबेकर व युवासेना विभाग युवा अधिकारी रितेश सावंत उपस्थित होते.

आर्थिक तंगीमुळे क्लास बंद

विद्यार्थी आणि पालकांनी यासंदर्भात युवासेनेशी संपर्क साधला. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरून युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विद्यार्थी आणि पालकांना घेऊन विद्यासागर क्लासेसचे संचालक कामत यांची भेट घेतली. आर्थिक तंगीमुळे क्लास बंद करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर विद्यार्थ्यांची फी परत द्या, असा आग्रह युवासेनेच्या पदाधिकार्‍यांनी धरला. कामत यांनी त्यावर धनादेशाद्वारे विद्यार्थ्यांची फी परत दिली.