
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून वाहून गेलेल्या 24 जणांपैकी आतापर्यंत 18 मृतदेह शोधण्यात यश आले आहे. एनडीआरएफ,स्थानिक मदत पथके युध्दपातळीवर वाहून गेलेल्यांचा शोध घेत होते. सहा मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रूपये मदतीचा धनादेश आज सांयकाळी खासदार विनायक राऊत आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते देण्यात आला. तसेच दहा हजार रुपयांची मदत देण्यात आली.
मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता तिवरे धरण फुटून हाहाःकार उडाला. तिवरे भेंडवाडीतील 24 जण वाहून गेली. बुधवारी सकाळपासून मृतदेहांचा शोध सुरु झाला. काल रात्री उशीरा पर्यंत 16 मृतदेह सापडले होते. वाहून गेलेल्या बळीराम जाधव यांना वाचविण्यात एनडीआरएफला यश आले. आज पुन्हा शोध मोहिम राबविण्यात आली. आज रणजीत काजवे वय 28 यांचा मृतदेह सापडला.
25 वर्ष झालेल्या सर्वच धरणाची दुरुस्ती आवश्यक – विनायक राऊत
शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी आज भेंडवाडी येथे दुर्घटनेची पहाणी करत मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले की, कालच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दोषींची चौकशी केली जाईल हे जाहीर केले आहे. आता ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असून गावातील एक जागा आम्ही सुचवली आहे तिथे सर्वांना घरे बांधून दिली जातील. त्याच जागेवर सध्या तात्पुरती निवाऱ्याची व्यवस्था केली जाईल, असे सांगताना या घटनेवरून राज्यातील सर्वच धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी करणार आहोत. त्याचबरोबर 25 वर्षांहून अधिक जुन्या धरणांची दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, विलास चाळके, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, क्षेत्रप्रमुख बाळा कदम, बांधकाम सभापती विनोद झगडे, जि.प.सदस्य रोहन बने, पं.स.सदस्य राकेश शिंदे, संदीप सावंत, दिलीप सावंत, शशिकांत मोदी उपस्थित होते.
शिवसेनेकडून कपडे वाटप
शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी भेंडवाडीतील ग्रामस्थांची भेट घेतली. यासर्व ग्रामस्थांची एका शाळेच्या सभागृहात व्यवस्था करण्यात आली आहे. आज ग्रामस्थांना सकाळपासून चहा, नाष्टा मिळाला नव्हता. त्यांनी खासदार विनायक राऊत यांना हि गोष्ट सांगताच त्यांनी तहसीलदारांना याबाबत सूचना दिल्या. तसेच यावेळी शिवसेनेच्या वतीने ग्रामस्थांना कपडे वाटप करण्यात आले.
तलाठी, पाटबंधारेच्या अधिकाऱ्याबाबत नाराजी
खासदार विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे तलाठी आणि पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांबाबत तक्रार केली. तलाठी ग्रामस्थांना वाटेल ती उत्तरे देत आहेत. काजरवाड गावात घराच्या बाहेर उभे राहून पंचनामा केला. घरातील नुकसानही त्यांनी पाहिले नाही. या गोष्टींकडे गांभीर्याने पहाण्याबाबत त्यांनी सूचना केल्या.


























































