
सामना प्रतिनिधी । मुंबई
जयपूरहून मुंबईला येणारे स्पाईसजेटचे विमान सोमवारी रात्री मुख्य धावपट्टीवरून घसरले. या अपघातात प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र,या अपघातानंतर मुंबई विमानतळावरील मुख्य धावपट्टी बंद ठेवण्यात आली असून दुसर्या धावपट्टीवरून विमान वाहतूक सुरू ठेवण्यात आली. दरम्यान, स्पाईस जेटचे घसरलेले विमान धावपट्टीवरून पुर्णपणे बाजूला करण्यात आलेले नाही. या पार्श्वभूमीवरमुख्य धावपट्टी गुरुवारीही बंद ठेवण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुख्य धावपट्टी बंद ठेवण्यात आल्यामुळे गेल्या दोन दिवसात तब्बल 280 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. दुस-या धावपट्टीची क्षमता अधिक नसल्यामुळे या धावपट्टीवरून मोठय़ा संख्येने विमान उड्डाणे घेता येणार नाहीत. त्यामुळे मोठया संख्येने विमान उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, जयपूरहून मुंबईला येणार्या विमानात 167 प्रवासी होते. प्रचंड पावसामुळे विमान धावपट्टीहून घसरले.



























































