भूसंरुंग स्फोटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षाचा हात?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । गडचिरोली

महाराष्ट्रदिनी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा-लवारी गावादरम्यान झालेल्या भूसुरुंगस्फोटाच्या तपासादरम्यान अटक करण्यात आलेला एक आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष असल्याची माहिती पुढे आली आहे. कैलास रामचंदानी असे त्याचे नाव आहे.

30 एप्रिलच्या रात्री नक्षलवाद्यांनी कुरखेडा तालुक्यातील दादापूर (रामगड) येथील रस्त्याच्या कामावरील 27 वाहने व अन्य यंत्रसामग्री जाळली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 1 मे रोजी जांभूळखेडा-लवारी गावादरम्यान असलेल्या नाल्याच्या पुलावर भूसुरुंगस्फोट घडविला. यात 15 पोलिस व एक वाहनचालक शहीद झाले होते. भूसुरुंगस्फोटाच्या घटनेशी संबंधित नक्षलवाद्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोची प्रमुख नर्मदाक्का व तिचा पती किरणकुमार यांना अटक करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन व अन्य पुराव्यांवरुन पोलिसांनी दिलीप हिडामी, परसराम तुलावी, सोमनाथ म्डावी, किसन हिडामी व सुकरु गोटा या पाच जणांना अटक केली होती. पोलीस कोठडीदरम्यान या पाच जणांची चौकशी केल्यानंतर पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. या भूसुरुंग स्फोटात कैलास रामचंदानी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षाचा हात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. कैलास याचे कुरखेडा येथे इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान असून गेल्या काही महिन्यांपासून तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कुरखेडा तालुकाध्यक्ष आहे. भूसुरुंगस्फोटासारख्या गंभीर गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुकाध्यक्षच अडकल्याने खळबळ उडाली आहे. त्याचा या घटनेत नेमका कसा सहभाग होता, किती दिवसांपासून तो नक्षलवाद्यांच्या संपर्कात होता, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.