
>> डॉ. विजय पांढरीपांडे
विद्यार्थी अन् पालकांसाठी जून-जुलै हे महिने विशेष महत्त्वाचे. खास करून बारावीनंतर पुढे काय? हा आयुष्याच्या, भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न. दहा-वीस वर्षांपूर्वी डॉक्टर, इंजिनीअर म्हणजेच सबकुछ ही धारणा होती. आय.आय.टी., एन.आय.टी.तला प्रवेश म्हणजे प्रतिष्ठsचाच नव्हे तर जीवनमरणाचा प्रश्न! त्यातही कॉम्प्युटर्स अन् आय.टी. क्षेत्राने धूम माजवलेली. आता मात्र चित्र बदललेले आहे. इंजिनीअरिंग अन् मेडिकलच्या महागडय़ा शिक्षणाच्या तुलनेत कॉमर्स, फायनान्स, सायबर लॉ, मूलभूत विज्ञान, लिबरल आर्टस्, इलेक्ट्रॉनिक माध्यम क्षेत्र, पत्रकारिता या इतर क्षेत्रांत तितक्याच संधी, तितकीच आव्हाने उपलब्ध आहेत.
कोर्स, करिअरची निवड करताना स्वतःची आवड-निवड जास्त महत्त्वाची. आपल्याला कोणती शाखा झेपेल हेदेखील पारखणे गरजेचे असते. आजकाल प्रत्येक शाखेत कोणते विषय शिकवले जातील, अभ्यासक्रम काय असेल, त्या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट काय, ते शिकल्याने नेमकी कोणती कौशल्ये विकसित होतील, हे सारे त्या त्या विद्यापीठाच्या, संस्थेच्या कॉलेजच्या वेबसाईटवर उपलब्ध असते. म्हणजे असायला हवे. अनेक विद्यार्थी/पालक हा शोध घेण्याचे, अभ्यासक्रमाचा तपशील तपासण्याचे कष्ट घेत नाहीत. इकडच्या तिकडच्या माहितीवरच जास्त अवलंबून राहतात. दुसरा कुणी काय सांगतो यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच आपल्याला काय हवे, काय पेलेल (आर्थिक अन् बौद्धिकदृष्टय़ा) याचा विचार जास्त महत्त्वाचा.
आजकाल बहुतेक विद्यापीठांत, खासगी शैक्षणिक संस्थांत चॉईस बेसड् क्रेडिट ग्रेडिंग पद्धत सुरू झालीय. या पद्धतीचे वैशिष्टय़ अन् मूळ उद्दिष्ट हे की, विद्यार्थ्याला विषय निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य द्यायचे. एवढेच नव्हे तर कुठे, काय, कधी, कोणत्या गतीने शिकायचे त्याचेसुद्धा स्वातंत्र्य द्यायचे. पण बहुतेक विद्यापीठ/संस्था हे स्वातंत्र्य पूर्णतः देत नाहीत, हे कटू सत्य. अभ्यासक्रमाची रूपरेखा ठरविताना (करिक्युलम डिझाईन) अजूनही प्राध्यापक त्यांना काय येते, सोपे जाते, सोयीचे ठरते याचा विचार करूनच अभ्यासक्रमाची आखणी करतात. जग कुठे चालले आहे. भविष्याच्या दृष्टीने कोणते आधुनिक विज्ञान/ तंत्रज्ञान उपयोगाचे आहे, आपल्या प्रदेशाची, राज्याची, देशाची प्राथमिक गरज काय आहे, मुख्य म्हणजे विद्यार्थ्याला काय शिकायचे आहे याचा विचार होतच नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यापीठाचा अभ्यासक्रम वेगळा, प्रत्येक राज्याचे शैक्षणिक धोरण वेगळे असा प्रकार होतो. परिणामी विद्यार्थ्याला भविष्यात स्थलांतर करताना, उच्च शिक्षणासाठी एका राज्यातून दुसऱया राज्यात, एवढेच नव्हे तर एका विद्यापीठातून दुसऱया विद्यापीठात जाताना ऍडजस्ट करताना याचा त्रास होतो. (विदर्भ/मराठवाडय़ातील विद्यार्थी पुण्या- मुंबईला गेले की, सुरुवातीला गोंधळतात, बुजतात हय़ाचे कारण हेच!) चॉईस बेसड् क्रेडिट सिस्टीममध्ये पदवीसाठी अमुक एक क्रेडिटस्ची संख्या ठरविल्यानंतर विद्यार्थ्याला मेजर अन् मायनर अशा विभागाअंतर्गत विषय निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य हवे. म्हणजे मला इतिहासात मेजर करायचे असेल तर साठ-पासष्ठ टक्के क्रेडिटस् इतिहास या प्रमुख शाखेतील विषयाचे निवडायचे अन् उरलेले पस्तीस-चाळीस टक्के क्रेडिटस् आपल्याला ज्या इतर विषयात स्वारस्य आहे किंवा भविष्याच्या, करिअरच्या दृष्टीने जे विषय उपयुक्त आहेत, गरजेचे आहेत ते निवडायचे.
अगदी इंजिनीअरिंगच्या क्षेत्रातसुद्धा हे निवड स्वातंत्र्य आजकाल गरजेचे झाले आहे. कारण स्पेशलायझेशनचे दिवस संपले. आता इंटर डिसिप्लिनरी – आंतरशाखीय – अभ्यासाची गरज आहे. म्हणजे मेकॅनिक्स, कॉम्प्युटर्स, ग्राफिक्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स या इतर शाखेतील निवडक विषयांचीसुद्धा तितकीच गरज आहे. एवढेच कशाला डॉक्टरलासुद्धा निदान करताना, तपासताना जास्तीत जास्त इलेक्टॉनिक्स / संगणक संबंधित उपकरणांचे ज्ञान असल्याशिवाय ती शिताफीने हाताळणे निश्चितच कठीण जाणार. एवढेच कशाला स्पोर्टस्च्या, त्यातल्या त्यात क्रिकेटच्या क्षेत्रात संगणकामुळे कॉम्प्युटर, ग्राफिक्समुळे स्टॅटिस्टिक्समुळे किती क्रांतिकारक बदल झाले, ते आपण बघतोच. बँकांचेसुद्धा लेजर बुक केव्हाच बाद झाले. आर्थिक चलनवलनाच्या पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाने पार बदलून टाकल्या आहेत. शिक्षण क्षेत्र, अभ्यासक्रम निवडताना म्हणूनच या सर्व बाबींचा विचार विद्यार्थी अन् पालकांनी दोघांनीही केला पाहिजे.
अमुक क्षेत्र छोटे अन् दुसरे महत्त्वाचे वरच्या दर्जाचे अशी वर्गवारी आता राहिलेली नाही. प्रशासनाच्या उच्च पदावर विराजित निवडक व्यक्तींचा बायोडेटा, शैक्षणिक प्रवास तुम्ही अभ्यासला तर हे सहज लक्षात येईल. तुम्ही कोणता अभ्यासक्रम केला, कोणत्या विद्यापीठात/कॉलेजात शिकला/ तुम्हाला कोणत्या ग्रेडस् मिळाल्या त्यापेक्षाही करिअरच्या दृष्टीने, विकासाच्या दृष्टीने, भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते ते तुमची वैयक्तिक, बौद्धिक क्षमता, कोणतेही आव्हान स्वीकारण्याची योग्यता, नावीन्याच्या पाठपुरावा करण्याची लवचिकता, उद्योग क्षेत्रात, व्यावसायिक क्षेत्रात तुम्ही कॉलेजात काय शिकला यापेक्षा तुम्ही नवीन काय शिकायला तयार आहात, किंबहुना कसे शिकावे हे शिकला की नाही, तेच महत्त्वाचे ठरते.
तेव्हा करिअर निवडताना, अभ्यासक्रम ठरविताना एकांगी विचार नको. सर्वांगीण विचार हवा.


























































