
सामना प्रतिनिधी । मुंबई
रत्नागिरी जिह्यातल्या चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणफुटी दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी आज जलसंधारण विभागाने विशेष चौकशी पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. दोन महिन्यांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश या पथकाला दिले आहेत.
मागील आठवडय़ात 2 जुलै रोजी चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून 19 जणांचा बळी गेला आहे. तर चारजण अद्याप बेपत्ताच आहेत. या धरण फुटीची सखोल चौकशी करण्यासाठी जलसंपदा विभागाचे सचिव व विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली हे पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकामध्ये जलसंधारण विभागातील मुख्य अभियंता (लघुसिंचन), रत्नागिरीचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक हे सदस्य आहेत.
तिवरे धरणफुटीच्या कारणांचा शोध घेऊन दोषींवर जबाबदारी निश्चित करणे, त्यानुसार अनुषंगिक चौकशी करणे, लघुसिंचन तलाव, पाझर तलाव, गाव तलाव, मालगुजारी तलाव व इतर तत्सम तलावांबाबतीत भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाय योजना सुचविणे ही या चौकशी पथकाची कार्यकक्षा असणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय राज्य शासनाने प्रसिद्ध केला आहे.






















































