
सामना प्रतिनिधी । हैदराबाद
आमदारांच्या राजीनाम्यामुळे कर्नाटकमध्ये राजकीय भूकंप आलेला असतानाच आता त्याची पुनरावृत्ती आंध्र प्रदेशमध्येही होणार आहे. तेलगू देसम पार्टीचे (टीडीपी) 18 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आंध्रात राजकीय भूकंप अटळ असल्याचे संकेत आंध्र प्रदेशचे भाजपचे प्रभारी सुनील देवधर यांनी दिले आहेत.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू भ्रष्टाचारात पुरते बुडाले आहेत. पुढील दोन वर्षांत ते जेलमध्ये जातील. त्याचा अंदाज आल्यानेच त्यांच्या टीडीपी पक्षाचे 18 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे सुनील देवधर यांनी स्पष्ट केले. तसेच चंद्राबाबू जेलमध्ये गेल्यानंतर राज्यात भाजपच विरोधी पक्ष असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चंद्राबाबूंबरोबरच त्यांचे जवळचे मित्र, नातेवाईकही भ्रष्टाचारात बुडालेले असल्याचेही ते म्हणाले. आंध्रात एकूण 175 आमदार असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसला बहुमत मिळाले असून जगनमोहन रेड्डी हे मुख्यमंत्रीपदावर बसले आहेत तर डीटीपीचे केवळ 23 आमदार आहेत. दरम्यान रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यांनतर तत्काळ चंद्राबाबू नायडू यांच्या सुरक्षेत कपात केली होती. तसेच दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती तेव्हाच चंद्राबाबू आणि टीडीपीच्या अडचणी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले होते.



























































