‘अक्षय’प्रवास!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ज्योत्स्ना गाडगीळ

कीर्तन हे तर समाजप्रबोधनाचे माध्यम! ‘डिजिटल इंडिया’मध्ये त्याचा फारसा प्रभाव दिसत नसला, तरी ‘ग्रामीण भारता’त अजूनही सर्व वयोगटातले भाविक मोठ्या संख्येने कीर्तन ऐकायला येतात. त्या जनसमुदायाला संतविचारांबरोबर समाजसुधारणेचे आणि सकारात्मक विचारांचे बाळकडू पाजत जगण्याची उमेद देत आहेत, अवघ्या तिशीतले कीर्तनकार ह.भ.प.अक्षय महाराज भोसले. गेल्या काही महिन्यांत जवळपास ३० दुष्काळी छावण्यांमध्ये कीर्तनसेवा देऊन त्यांनी हताश झालेल्या बळीराजाला जगण्याची उमेद आणि सेवाभावी संस्थांचा मदतीचा हात पोहोचवला आहे. त्याविषयी…

सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे।
परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे।।

समर्थ रामदासांनी ह्या दोन ओळींमध्ये चळवळीचे आणि अध्यात्माचे महत्त्व सांगून ते परस्परपूरक असल्याचे सांगितले आहे. हे मर्म लक्षात घेऊन अक्षय महाराजांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कीर्तनाच्या माध्यमातून दुष्काळ निवारण चळवळ राबवली. ५० जणांच्या तुकडीसह ३० दुष्काळी छावण्यांची भेट घेतली आणि हरीकीर्तनातून व श्रमदानातून समस्येवर तोडगा काढला.

दुष्काळामुळे नैराश्येच्या गर्तेत गेलेला शेतकरी आपल्यावर आलेल्या संकटासाठी देवाला दोषी धरू लागला आणि आध्यात्मापासून दूर जाऊ लागला. मात्र, दुष्काळाचे सावट निसर्गनिर्मित नसून ते मानवनिर्मित आहे, ह्याची जाणीव करून देत अक्षय महाराजांनी तुकोबारायांच्या काळातले दाखले दिले आणि ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’सारख्या निवडक अभंगातून आणि माऊलींच्या ओवीतून वृक्षरोपणाचे महत्त्व पटवले. पाण्याची बचत, पुनर्वापर, वृक्षलागवड केली, तर आपल्यावर उद्भवली अशी परिस्थिती पुढल्या पिढीवर उद्भवणार नाही, असे त्यांनी नुसते सांगितले नाही, तर श्रमदानातून पटवूनही दिले. तसेच ‘महा एनजीओ फेडरेशन’च्या मदतीने रिकाम्या हातांना रोजगार, कोणाला मदत निधी, कोणाला वस्त्रदान, कोणाला दैनंदिन गरजेच्या वस्तू, तर कोणाला आर्थिक पाठबळ देऊन स्वावलंबी बनवले. स्वत: हातात कुऱ्हाड, फावडे घेऊन दुष्काळी भागात काम केले. लोकांमध्ये मिसळून, त्यांचे प्रश्न समजून घेत, त्यावर मार्गदर्शन करत त्यांनी शेतकऱ्यांना नैराश्येतून बाहेर काढले. व्यसनाधीन मजुरांकडून व्यसनमुक्तीची शपथ घेतली. सकारात्मक वातावरण तयार करून आत्मनिर्भर केले.

अक्षय महाराज मूळचे सातारा जिल्हातील बिजवडी गावचे. मुंबईत ते पवईला आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. अत्यंत कमी वयात त्यांनी वारकरी संप्रदायात आपली ओळख निर्माण केली आहे. अर्थात त्यामागे त्यांनी अपार कष्ट घेतले . त्यांच्या घरात आध्यात्मिक वातावरण असल्याने बालपणापासून त्यांना भजन-कीर्तनाची गोडी लागली. आई-वडिलांबरोबर कीर्तनाला जाणे हे तर नित्याचेच झाले होते. कीर्तन ऐकायचे आणि घरी आल्यावर कीर्तनात आवडलेले मुद्दे वहीत लिहून काढायचे, अशी सवयच त्यांना लागली.

एकदा वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू प्रमोद महाराज जगताप यांचे कीर्तन ऐकण्याचा योग आला. त्यांचे कीर्तन ऐकून अक्षय महाराज खूप प्रभावित झाले. कीर्तनाच्या अखेरी त्यांनी सांगितलेले शब्द अक्षय महाराजांच्या बालमनावर कोरले गेले. ते शब्द होते, `तुळशीची माळ घातल्यावर तुम्हाला देव भेटेल की नाही याची मी खात्री देऊ शकत नाही, मात्र तुमची पाऊले चुकूनही वाममार्गाकडे जाणार नाहीत याची मी खात्री देतो. भरकटलेल्या समाजाबरोबर वाहवत न जाता तुळशीची माळ घाला, सत्कार्य करा आणि सन्मार्गाला लागा.’ तो क्षण आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा होता असे अक्षय महाराज सांगतात. मात्र त्यांच्या वडिलांनी त्यांना आधी शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. बाकी काही येत नाही म्हणून कीर्तनाला लागला, असे समाजाने म्हणू नये म्हणून त्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. वडिलांचा शब्द प्रमाण मानून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. वडिलांचा सल्ला ऐकला, म्हणून आज उच्चशिक्षित कीर्तनकार म्हणून लोकांची कौतुकाची थाप घेताना आनंद वाटतो, असेही ते आवर्जून सांगतात.

शालेय शिक्षण सुरू असताना त्यांनी पारमार्थिक शिक्षण आपल्या आईकडून घेतले. तर, वारकरी पंथाची दीक्षा व अनुग्रह प्रमोद महाराज जगताप यांच्याकडून घेतली. संस्कृतचे गाढे अभ्यासक वा. न. उत्पात, सद्गुुरू बाबामहाराज सातारकर, आचार्य रामकृष्ण महाराज लहवितकर, सुभाष महाराज घाडगे, योगीमहाराज गोसावी यांच्याकडूनही त्यांना वारकरी संप्रदायाचे शिक्षण व मार्गदर्शन मिळाले. तालमार्तंड पं. माणिक मुंडे तसेच पं़ सूर्यकांत गायकवाड यांच्याकडे शास्त्रीय पखवाज वादन तसेच गायनाचे धडे गिरवल़े.

वारकरी संप्रदायात सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या, ज्ञानसंपन्न असणाऱ्या पूज्य देगलूरकर परंपरेचे अक्षय महाराज पाईक आहेत. चैतन्य महाराज देगलूरकर आणि प्रमोद महाराज जगताप हे त्यांचे आदर्श आहेत. आजवर एवढ्या लहान वयात त्यांना महान व्यक्तींना भेटण्याचा योग आला. गोविंद महाराज केंद्रे, डॉ. नारायण जाधव, योगीराज महाराज गोसावी यांसारखे अध्यात्म जगातले गुरू, तसेच भारतरत्न लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, पं. हरीप्रसाद चौरसिया, श्रेष्ठ पखवाजवादक माणिक मुंडे, पं. भवानी शंकर यांसारख्या दिग्गज मंडळींचेही मार्गदर्शन त्यांना मिळाले.

अक्षय महाराजांनी वयाच्या १७ व्या वर्षी प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून भक्ती संप्रदायाचा प्रचार प्रारंभ केला. अंधश्रद्धा निर्मुलन, साक्षरता, जातीयता निर्मुलन, व्यसनमुक्ती, स्त्री शिक्षण, ग्रामस्वच्छता, रक्तदान, नेत्रदान यांसारखे सामाजिक विषय ते कीर्तनातून ओघवत्या शैलीत मांडतात. विविध वृत्तपत्रे, मासिके, विशेषांकांतून त्यांचे आध्यात्मिक विषयावर लिखाण सुरू असते. वारकरी संप्रदायाचे मुखपत्र मासिक `वैष्णव दर्शन’ याचे ते मुख्य संपादक आहेत. कीर्तनाच्या निमित्ताने महिन्यातले २० दिवस ते घराबाहेर असतात. तसे असूनही त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मासिकाच्या कामात कधी खंड पडू दिला नाही. या क्षेत्रातले २८ गाढे अभ्यासक त्यांना दर महिन्याला ठरलेल्या वेळी न चुकता लेख पाठवतात. ते आपल्या टीमसह लेखांचे संकलन, संपादन, पृष्ठ सजावट करून मासिक प्रकाशित करतात. त्या मासिकाच्या एकूण १५,००० प्रति छापल्या जातात. त्यासाठी वारकरी सांप्रदायाकडून आर्थिक पाठबळ मिळते.
अक्षय महाराजांच्या कीर्तनाला हजारो श्रोते उपस्थित असतात. त्यांच्या रसाळ आणि अभ्यासपूर्ण वाणीने प्रभावित झालेले लोक त्यांच्या मासिकाचे सभासद होतात. ते सांगतात, `वार्षिक सभासद मूल्य केवळ २५० रुपये असल्याने मासिकातले विचारधन लुटण्यासाठी सभासदांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एखाद्या सामाजिक प्रश्नाला अर्थसहाय्य करण्यासाठी जनतेकडे आवाहन केले असता, ते विश्वासाने, मुक्त हस्ताने आर्थिक मदत करतात. मध्यंतरी एका दुष्काळग्रस्त गावाला संप्रदायाच्या निधीतून आम्ही ८-९ लाख रुपयांची मदत करू शकलो. युवा शक्ती संघटित करून आम्ही अनेक सामाजिक प्रश्नांवर काम करत आहोत. ज्यात ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षण, शिक्षण सामग्री, महिला सबलीकरण, ग्रामस्वच्छता इ. गोष्टींचा समावेश आहे. ‘

अक्षय महाराजांकडे ८५० हून अधिक विविध विषयांचे मौलिक ग्रंथ आहेत. शिवाय आजवर टिप्पणे काढून ठेवलेल्या स्वहस्ताक्षरातल्या १५-२० डायऱ्या आहेत. हा सर्व माहितीचा खजिना त्यांना ब्लॉग लिखाणाच्या वेळी कामास येतो. एखाद्या विषयाची उकल करताना संदर्भ ग्रंथाची मदत होते. १२,००० लोक त्यांच्या ब्लॉगचे सभासद आहेत. त्यांत डॉक्टर्स, इंजिनीअर्स, वकील, आयएएस-आयपीएस झालेल्या लोकांचाही समावेश आहे. तरुण पिढीचाही ब्लॉगला भरघोस प्रतिसाद आहे. ब्लॉगसंदर्भात दिवसातून १०-१२ लोकांचे फोन येतात. कोणी आभार मानतात, तर कोणी मार्गदर्शन करतात. या सर्वाचा प्रतिसादाचा फायदा ब्लॉगला होतो. ब्लॉगला `गुगल ट्रान्सलेटर’ जोडल्यामुळे ब्लॉगवरचा मजकूर ३६ मुख्य भाषांमध्ये वाचायला मिळतो. परिणामी ब्लॉगला विविध भाषिक, विविध प्रांतीय, विविध देशातील वाचक जोडले जात आहेत.

`वारकरी संप्रदाय युवा मंच’ या अ‍ॅपवर तर वरील सर्व माहितीसह वारीचे सर्व अपडेट्स पुरवले जातात. आळंदीचे ट्रस्टी प्रशांत सरू, माऊलीचे पारंपरिक चोपदार राजाभाऊ यांच्याकडून वारीची इत्थंभूत माहिती वेळोवेळी मिळते. ती माहिती अ‍ॅपवर अपडेट केली जाते. तसेच महाराष्ट्रातील मुख्य संतसंस्थानांकडूनही उत्सवाची, सोहळ्याची माहिती मिळते. पंढरपूर संस्थानाने विठोबा-रखुमाईचे थेट प्रक्षेपण काही वर्षांपासून सुरू केले आहे. मात्र लोकांना त्यासंदर्भात जास्त माहिती नसल्याने थेट प्रक्षेपणाची लिंक अ‍ॅपला जोडली गेली आहे. त्यामुळे अ‍ॅप युजर्सना सद्विचारांसोबत भगवंताचेही घरबसल्या दर्शन घडत आहे. याचे एक उदाहरण म्हणजे एचसीएल वंâपनीच्या मुख्य पदावर काम करणारे शिवानंद जाधव हे वारकरी असून इंग्लंडमध्ये राहूनही वारीचा आणि विठोबाच्या दर्शनाचा लाभ घेत आहेत.

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून वारकरी संप्रदाय जगभर पसरवण्याचा अक्षय महाराजांचा मानस आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांचा परस्परसंबंध समजावून घेण्यासाठी ते योगगुरू बाबा रामदेव यांचेही मार्गदर्शन घेत आहेत. तसेच महासंगणकाचे रचेते पद्मश्री विजय भाटकर यांचेही तंत्रज्ञानविषयक मार्गदर्शन घेण्याच्या ते प्रयत्नात आहेत.

काळाची गती ओळखून पावले टाकणारी व्यक्ती जगाच्या स्पर्धेत कधीच मागे पडत नाही. अक्षय महाराजांनी नेमकी ती गती अचूक पकडलेली आहे. तंत्रज्ञानाची कास धरून त्यांनी अध्यात्माचा सुरू केलेला हा `अक्षय’प्रवास अखंड चालू राहो आणि त्यांच्यासोबत आपल्या अन्नदात्या बळीराजावर विठुरायाची कृपादृष्टी राहो, ही सदिच्छा!