
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
पाकिस्तानकडून नेहमीच शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असते. काही वेळा पाकिस्तान भर लोकवस्तीच्या आडून तोफगोळे टाकत असतो. अशा वेळी भरवस्तीतही शत्रूला अचूक टिपण्यासाठी हिंदुस्थान आता अमेरिकेकडून एक्सकॅलिबर गाईडेड तोफगोळे खरेदी करणार आहे.
हिंदुस्थानकडे लांब पल्ल्याच्या बोफोर्स तोफा आहेत. त्याने शत्रूवर अचूक मारा करता येतो. मात्र, पुलवामा हल्ल्यानंतर बोफोर्सपेक्षाही जास्त अचूक मारा करण्यासाठी एक्सकॅलिबर गाईडेड तोफगोळय़ांचा वापर करता येईल.
एक्सकॅलिबर्स गाईडेड तोफगोळय़ाची वैशिष्टय़े
जीपीएस यंत्रणा यात असल्यामुळे 50 किलोमीटरपेक्षाही दूर असलेल्या शत्रूला अचूक टिपता येते. अफगाणिस्तानमधील युद्धावेळी अमेरिकेने हे गाईडेड तोफगोळे विकसित केले होते. सीमेलगत तैनात असलेल्या चौक्यावरील सैनिकांना हे तोफगोळे पुरवण्यात येणार आहेत. हे तोफगोळे टाकण्यासाठी अमेरिकेकडून ‘एम-77 अल्ट्रा लाईट होव्हित्जर्स’ या तोफा खरेदी केल्या जाणार आहेत. या तोफगोळय़ांमुळे शत्रूचे बंकर्सही उद्ध्वस्त करता येणार आहेत.
हिंदुस्थानची शस्त्रखरेदी वाढली
गेल्या काही वर्षांत हिंदुस्थानची शस्त्रखरेदी वाढली आहे. हवाई दलासाठी स्पाईक अँटी टँक गाईडेड क्षेपणास्त्र, बालाकोटमध्ये दहशतवाद्यावर टाकण्यात आलेले स्पाईस 2000 हा बॉम्ब इस्राईलकडून घेण्यात आला होता. त्याचे अपग्रेड वर्जन घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर अमेरिकेकडून अटाका अँटी गाईडेड क्षेपणास्त्र खरेदी केली जाणार आहेत.























































