
सामना ऑनलाईन । काठमांडू
नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. तर 24 जण बेपत्ता आहेत. अतिवृष्टीने पूर आलेल्या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतूक ठप्प आहे.
#UPDATE Nepal Police: 43 people dead, 24 missing, & 20 injured due to flooding and landslide in the country, following incessant rainfall. pic.twitter.com/S4gtQGUjJA
— ANI (@ANI) July 14, 2019
नेपाळमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले तर काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. या पूरामुळे काही ठिकाणी भूस्खलन झाले आहे. पूराची तीव्रता जास्त असलेल्या ठिकाणाहून लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याने प्रमुख राष्ट्रीय महामार्गासह इतर मार्गांरील वाहतूक ठप्प झाली आहे. नेपाळमध्ये पूरामुळे 6 हजार नागिरकांना फटका बसला आहे. अतिवृष्टी आणि पूरामुळे दुर्घटनांची संख्या वाढत आहे. त्यात सर्वाधिक नुकसान भूस्खलनामुळे झाले आहे. भूस्खलाच्या घटनांमुळे आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. ललीतपूर, कावरे, कोटंग, भोजपूर आणि मकनपूर या भागातील बचावकार्याला वेग देण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. देशातील 200 ठिकाणी अतिवृष्टीचा फटका बसल्याचे वृत्त आहे.
पूर आणि भूस्खलाच्या घटनांमध्ये झालेल्या मृत्यूबाबत नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी खेद व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचेही त्यांनी सांगितले. या दुर्घटनेतील पीडितांना सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.



























































