वीजेच्या धक्क्याने जळकोटमध्ये तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जळकोट

लोखंडी पान टपरीत विद्युत प्रवाह उतरुन वीजेचा धक्का लागल्याने जळकोटमधील 28 वर्षांच्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

येथील गणेश बाबुराव हलकरे (वय 28) हा रोजच्या प्रमाणे जळकोट – उदगीर रोडवरील स्वतःच्या पान टपरीत बसला होता. त्यावेळी विद्युत प्रवाह बंद होता. काही वेळाने पान खाण्यासाठी एक तरुण पान टपरीवर आला. त्यावेळी त्याला या लोखंडी पानटपरीत विद्युत प्रवाह उतरल्याचे लक्षात आले. ही माहिती त्याने गणेशला दिली. मात्र, गणेश लाकडच्या फळीवर बसल्याने त्याला विद्युतप्रवाह जाणवला नाही. थोड्या वेळाने तो लाकडाच्या फळीवरुन उतरून पान टपरीचा लोखंडी दरवाजा उघडून बाहेर येत असताना वीजेचा जबरदस्त धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती जळकोट पोलिसांना दिली असून घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी जळकोट येथील ग्रामीण रूग्णालयात पाठवला. त्याच्या पश्चात आई- वडील, पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे.