
सामना प्रतिनिधी । मुंबई
राजश्री मराठीची ‘यू टर्न’ ही वेबसिरीज लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. नुकताच ‘यू टर्न’चा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. ओमप्रकाश शिंदे आणि सायली संजीव यांची प्रमुख भूमिका असलेल्या या वेबसिरीजची निर्मिती नेहा बडजात्या यांनी केली असून दिग्दर्शन मयूरेश जोशी यांचे आहे. ट्रेलरवरून ही वेबसीरिज लग्नानंतरच्या आंबट-गोड क्षणांवर आधारित आहे, याचा अंदाज आपण नक्कीच बांधू शकतो. लग्न यशस्वी होण्यासाठी काय करावे याचे सल्ले देणारे आदित्य आणि मुक्ता लग्नानंतर छोटय़ा छोटय़ा गोष्टींवर वाद घालताना यात दिसत आहेत आणि हेच वाद अखेर टोकाला जातात. एका नाजूक वळणावर आल्यानंतर आदित्य आणि मुक्ता काय निर्णय घेतात? ‘यू टर्न’ घेणार, की त्यांचे मार्ग वेगळे होणार? याची उत्तरं मात्र ही वेबसीरिज पाहिल्यावरच आपल्याला मिळतील. ही वेबसीरिज 23 जुलैपासून दर मंगळवारी दुपारी 1.30 वाजता राजश्री मराठीच्या यू टय़ूब चॅनेलवर पाहता येईल.


























































