इशा दिसणार शहजादीच्या भूमिकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निम्मा शिम्मा राक्षस. पुन्हा एकदा रत्नाकर मतकरींच्या सिध्दहस्त लेखणीतून उतरलेले बालनाटय़ समस्त प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नाटकाची शहजादी गायत्री दातारशी तिच्या पहिल्यावाहिल्या नाटय़ानुभवाविषयी गप्पा.

‘तुला पाहते रे’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी ईशा म्हणजेच आपली गायत्री दातार रंगभूमीवर पदार्पण करतेय. राहुल भंडारे निर्मित ‘निम्मा शिम्मा राक्षस’ या बालनाटय़ाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, पण यावेळी तिची भूमिका थोडी वेगळी असणार आहे. सोज्वळ, शांत अशी प्रतिमा असलेली गायत्री खेळकर, खोडकर अशी पाहायला मिळणार आहे. सध्या या नाटकाच्या जोरदार तालमी सुरू आहेत. त्यामुळे तिच्याचकडून तिच्या नाटकाविषयी जाणून घेऊया.

मी कायम म्हणत आले आहे की, मला प्रत्येक माध्यम अनुभवायचे आहे. मालिका केली लवकरच माझा सिनेमा येईल आणि आता नाटक करतेय. तिन्ही गोष्टी मला अनुभवता आल्या आणि ती माझ्यासाठी खूप चांगली संधी आहे. अद्वैद थिएटर्सचं ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीला पडले होते. खूप छान नाटक होतं ते. चिन्मय मांडलेकरसोबत काम करायला मिळणं आणि रत्नाकर मतकरींची कथा असणं याच्यासारखं कॉम्बिनेशन आणखी असूच शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे माझी मालिका संपल्या संपल्याच काही दिवसांतच मला नाटकाची ऑफर आली आणि प्रेक्षकांच्या जवळ राहण्याची आणखी एक संधी मिळाली. याच्यापेक्षा वेगळा आनंद असूच शकत नसल्याचे ती सांगते.

बालनाटय़ करणं हे माझ्यासाठी एक आव्हानच होतं. कारण लहान मुलं फार मुडी असतात. त्यांची समजूत काढणं फार कठीण असतं. त्यांच्या मनाप्रमाणेच ते वागत असतात. त्यामुळे त्या सगळ्यांना इतका सगळा वेळ पकडून ठेवणं आणि त्यांना तेवढा वेळ त्यात मनोरंजक पद्धतीने ठेवणं खूप अवघड आहे त्यामुळे बालनाटय़ करणं फार आव्हानात्मक असतं असं तिचं म्हणणं आहे.

रोज चांगला आणि उत्तम अभिनय करणं हा मालिकेचा भाग आहे, प्रत्येक माध्यमात काम करण्याचं वेगवेगळं आव्हान असतं. नाटकांचं म्हणाल तर तिथे रिटेक नावाचा प्रकार नसतो. काही चूक झाली तर तुम्हाला ती तिथल्या तिथे सांभाळून घ्यायची आहे किंवा प्रेक्षकांकडून प्रतिक्रिया कशी मिळवायचा हे आपल्या हातात असते. रंगभूमीवरचा वावर, आवाज लावणं हे सगळं मालिकेपेक्षा वेगळं असतं. मालिकेत मी खूप शिकले आणि नाटकातही खूप शिकतेय. दिग्दर्शक, सहकलाकार यांच्याकडून सध्या शिकतेय. माझ्या मते, ते शिकणं हिच माझ्यासाठी वेगळी तयारी असल्याचे गायत्री प्रांजळपणे कबूल करते.

पूर्ण वेगळ्या भूमिकेत दिसणार
या नाटकात ती एका शहजादीची भूमिका करतेय, ती एका सुलतानाची मुलगी असते. अतिशय बबली, निरागस आणि खेळकर, खोडकर अशी आहे. ईशाची जी भूमिका मी केलीय ती सोज्वळ, समजूतदार, गंभीर स्वभावाची होती. या नाटकाच्या माध्यमातून मला माझी दुसरी बाजू दाखवता येणार आहे. ही संपूर्णतः वेगळी भूमिका आहे, असे तिचे आपल्या नव्या व्यक्तिरेखेविषयी म्हणणे आहे.

मराठी नाटकात थ्रीडी तंत्र प्रथमच
या नाटकात थ्री डी तंत्र वापरलं आहे. या तंत्राचा वापर काही हिंदी नाटकासाठी केला गेला आहे, पण मराठी नाटकात पहिल्यांदाच हा प्रयोग आपण करत आहोत. या नव्या तंत्राच्या वापरामुळे, त्याच्या अनुभवामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनात वाढ होईल हे निश्चित, असं गायत्रीला वाटते.