
>> डॉ. सुधीर राशिंगकर
हरयाणातील छोटय़ा खेडेगावातील एक मुलगा हिंदुस्थानातील पहिल्या 18 श्रीमंतांत केवळ पाच दशकांत भरारी मारतो हे अविश्वसनीय सत्य प्रत्यक्षात उतरवणारे उद्योजकीय व्यक्तिमत्त्व म्हणजे या चरित्राचे नायक सुभाषचंद्र. त्यांना ‘हिंदुस्थानातील मीडिया सम्राट’ म्हणूनही ओळखले जाते. 17व्या वर्षी खिशात फक्त 17 रुपये असताना शिक्षण अर्धवट सोडून वडिलांच्या तोटय़ात गेलेल्या व्यवसायाला पुनश्च उभे करण्याची जिद्द बाळगून त्यांनी आपल्या उद्योजकीय कामगिरीला सुरुवात केली. तसेच काही वर्षांतच सगळी देणी भागवून आपल्या व्यवसायाला कर्जमुक्त केले. एवढेच नव्हे तर एका दशकात त्यांनी आपल्या व्यवसायाला 100 कोटी रुपयांच्या व्यवसायात बदलले आणि आज ESSEL GROUP या हिंदुस्थानभर आणि जगभर विस्तार असलेल्या आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या उद्योगसमूहात त्याचे रूपांतर केले. आजघडीला त्यांची वैयक्तिक संपत्ती (नेट वर्थ) आहे 560 कोटी डॉलर्स (63,200 कोटी रुपये).
एखाद्याला अडथळा वाटणारी कोणतीही संधी त्यांनी अडथळा म्हणून बाजूला सारली नाही, तर तिचा वेळोवेळी समर्पक उपयोग करून घेतला. मग ती वडिलांच्या व्यवसायाची दिवाळखोरी असो, अर्धवट सोडून द्यावे लागलेले शिक्षण असो वा पुढे उद्योगात आलेल्या अनेक आव्हानात्मक अडचणी असोत, उद्योगवृद्धीचा त्यांनी सातत्याने ध्यास घेतला. त्यातून विविध क्षेत्रांत उच्च पातळी गाठलेले वीसहून अधिक उद्योग त्यांनी उभे केले, ज्यात विविधता आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा समर्पक उपयोगही त्यांनी केला आहे. आपल्या घराण्यातील सर्वात ज्येष्ठ घटकाचे कर्तव्य म्हणून त्यांनी परिवारातील साऱया सक्षम मंडळींना आपल्या उद्योगविश्वात स्थान देत त्यांच्यावर विश्वासाने विविध जबाबदाऱयाही सोपवल्या. त्याचबरोबर जिथे गरज वाटली तिथे त्यांनी त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना अधिकारपद देऊन उद्योगात व्यावसायिकताही जोपासली. युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडनने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करून त्यांच्या उद्योजकीय कर्तृत्वाची दखल घेतली आहे.
अर्थात केवळ संपत्ती वाढवणे हे सुभाषचंद्र यांनी आपले जीवितकार्य मानले नाही. विपश्यना या संकल्पनेचा त्यांनी प्रसार केला. त्यासाठी आपल्या ESSEL WORLD मध्ये मुंबईला त्यांनी स्तूपही बांधला. मुलांसाठी KIDZEE आणि ZEE LEARN तसेच Brain Trust of India हे उपक्रमही ते राबवतात. आपल्या Zee चॅनेल्सवर तरुण वर्गासाठी समुपदेशन करतात. एकल विद्यालय फाऊंडेशनमार्फत आदिवासीबहुल क्षेत्रात काम करतात. यातून त्यांची सामाजिक बांधिलकी दिसून येते. आपल्या हिसार या हरयाणातील भागाचे राज्यसभेत त्यांनी काही काळ प्रतिनिधित्वही केले आहे..
अशा या धडाकेबाज उद्योजकाचे रुपांतर एका उद्योगपतीत झाले ते केवळ 3-4 दशकांत. लेखक सुधीर सेवेकर यांनी हे चरित्र मांडताना सुभाषचंद्र यांचे कसोटीचे प्रसंग, व्यवसायातील चढउतार यातून कसे मार्ग काढले ते सोदाहरण स्पष्ट केले आहे. सुभाषचंद्र यांच्या प्रदीर्घ जीवनप्रवासातील अनेक बारकावे, विचारपूर्वक धाडसी निर्णय घ्यायची क्षमता, उद्योजकीय गुणवैशिष्टय़े, प्रगल्भ बुद्धिमत्ता, कौटुंबिक आणि सामाजिक बांधिलकी हे सारं पुस्तकात दिसून येते, अशा निर्मितीबद्दल त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले पाहिजे. या पुस्तकाच्या प्रकाशनाने आणखी एका उत्तम पुस्तकाची भर मराठी साहित्यविश्वात पडली आहे. मराठी उद्योजक आणि अन्य वाचक या पुस्तकाचे निश्चितच स्वागत करतील ही खात्री आहे.
माध्यमसम्राट सुभाषचंद्र गोयल
लेखक – सुधीर सेवेकर
प्रकाशन – साकेत प्रकाशन, संभाजीनगर
पृष्ठे – 216 मूल्य – 250 रुपये

























































