
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकांवेळी वादग्रस्त विधाने करण्यासाठी 48 तास प्रतिबंध लागलेल्या मनेका गांधी या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. सुलतानपूरच्या खासदार असलेल्या मनेका यांनी एका अधिकाऱ्याला तुम्ही राजा असाल किंवा कर्मचारी, आमच्या भीकेवर जगताय, असं वादग्रस्त विधान केलं आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, मनेका या सुलतानपूर दौऱ्यावर होत्या. या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी मनेका येथील विद्युत विभागाची तपासणी करत होत्या. त्यासंबंधी प्रश्नोत्तरासाठी त्यांनी एक बैठकही घेतली. या बैठकीवेळी एका तक्रारीबाबत प्रश्नोत्तर सुरू असताना त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्याला खडेबोल सुनावले. पण, ते सुनावत असताना त्यांची जीभ घसरली आणि त्या म्हणाल्या की, ”तुम्ही राजा असाल किंवा छोटे-मोठे कर्मचारी… तुम्ही आमच्याच भीकेवर जगताय.” असं मनेका यावेळी म्हणाल्या. या घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे मनेका यांच्यावर टीका होत आहे.



























































