कर्जबाजारी शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, औसा

तालुक्यातील नागरसोगा येथील जनक विठ्ठल काळे (वय 40) शेतकऱ्याने शनिवारी विष प्राशन केले होते. स्वतःच्या शेतात जाऊन विषारी औषध पिलेल्या या शेतकऱ्यास शेजारी व त्याच्या कुटुंबियानी त्यांना तत्काळ औसा येथे उपचारासाठी नेले. पण औशात उपचार होऊ न शकल्याने त्यांना लातूरला हालविण्यात आले. लातूर येथे उपचार सुरू असताना रविवारी रात्री रुग्णालयात मृत्यू झाला.

जनक काळे या शेतकऱ्याच्या नावे एका राष्ट्रीयकृत बँकेचे तसेच खाजगी कर्ज देणे होते. तसेच मागील तीन वर्षात दोन मुलींचे लग्न झाले होते. या लग्नासाठी त्यांनी बँक कर्ज तसेच खाजगी कर्जही काढले होते. पण मागील दोन – तीन वर्षे शेतीमध्ये उत्पादन न निघाल्याने आता हे कर्ज व देणी फेडायचे कसे यामुळे ते मागील काही दिवसांपासून हाताश होते. मागील दोन वर्षे दुष्काळात गेली आणि यावर्षी तर पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले, पण अद्याप पाऊसही नाही आणि पेरण्याही नाहीत. त्यामुळे हाताश होऊन त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली. लातूर येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले.सोमवारी सकाळी नागरसोगा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.