
सामना ऑनलाईन । लखनऊ
उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातील असरौली गावात एक विचित्र घटना घडली आहे. विषारी साप चावल्यावर सापाच्या विषाने किंवा साप चावल्याच्या भीतीनेच अनेकांचा मृत्यू होतो. मात्र, असरौली गावात एका दारुड्याला विषारी साप चावला. त्याचा त्याला राग आला. त्याने रागात सापाला पकडून त्याचे चावे घेतले, त्या सापाला चावून दारुड्याने सापाचे तीन तुकडे केले. त्यामुळे सापाचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना पाहून दारुड्याचे शेजारी घटनास्थळी आले. त्यांनी त्या सापाचे तुकडे पिशवीत भरले आणि दारुड्याला घेऊन ते रुग्णालयात पोहचले. सापाचे विष शरीरात पसरल्याने दारुड्याची प्रकृती गंभीर आहे. त्याच्या शरीरात विष पसरल्याने त्याला आगरा येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. गावकऱ्यांनी मृत सापावर अंत्यसंस्कार केले आहेत. विषारी साप चावल्यावर माणसाचा मृत्यू होतो. मात्र, या घटनेत माणसाचा मृत्यू झाला नसून माणूस चावल्याने विषारी सापाचा मृत्यू झाला आहे. एटा जिल्ह्यामध्ये सध्या या विषयाचीच चर्चा सुरू आहे.
























































