
सामना ऑनलाईन, मुंबई
ज्यांना आपल्या मुलांना सांभाळता येत नाही आणि ती जर आमच्याकडे येत असतील तर त्यात आम्हाला दोष देऊ नये. ती घर का सोडून गेली याबाबत समोरच्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाजनादेश यात्रे’च्या लोगोचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ईडी वगैरेची भीती आम्ही कोणाला कशाला दाखवू उलट आम्ही गेल्या साडेचार वर्षांत विकासाची जी कामे केली त्यामुळे प्रभावित होऊन हे सगळे प्रवेश होत आहेत. आम्ही विकासनिधी देताना कधीच सत्ताधारी व विरोधी पक्षाचा आमदार असा भेदाभेद केला नाही. त्यामुळेच ज्यांना अधिक काम करण्याची इच्छा आहे, ते भाजपमध्ये येत असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
बुधवारी होणार मेगाप्रवेश
भापजमधील पक्ष प्रवेशाबाबत विचारले असता ते म्हणाले, बुधवारी सकाळी 10 वाजता मुंबईतील गरवारे पॅव्हेलियनच्या सभागृहात हा ‘मेगाप्रवेश’ होणार आहे. माजी राज्यपाल राम नाईक यांचा राज्यपालपदाचा कार्यकाळ संपला आहे. राज्यपाल बनतेवेळी त्यांनी पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आता त्यांना पुन्हा पक्षात सक्रिय व्हायचे आहे. म्हणून मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांना पुन्हा एकदा पक्षाचे सदस्यत्व देण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
कालिदास कोळंबकर यांचा राजीनामा
भाजपच्या वाटेकर असलेले काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी आज काँग्रेसच्या पदाचा राजीनामा दिला. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा लेखी स्वरूपात सादर केला. कोळंबकर मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. यापूर्वीच कोळंबकर यांनी भाजपात प्रकेश करण्याबाबत घोषणा केली होती, तर त्यांच्या संपर्क कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावले होते. बॅनरकरून काँग्रेसचे चिन्ह गायब झाले होते.
ही स्वबळाची तयारी नाही
इतक्या मोठय़ा इनकमिंगमुळे भाजपा विधानसभेसाठी स्वबळाची तयारी करत आहे का, असा प्रश्न विचारला असता, ही स्वबळाची तयारी अजिबात नाही. याकडे केवळ 288 विधानसभा मतदारसंघांच्या दृष्टीने पाहू नये. युतीमध्ये राहूनच पुढील निवडणुका लढवायच्या आहेत. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, सहकारी संस्था अशा प्रकारच्या अनेक निवडणुका पाच वर्षांत होत असतात. त्यामध्येही पक्षाचे बळ वाढवायचे आहे. त्यासाठी ही तयारी सुरू आहे. शिवसेनेसोबत युतीची चर्चा करायला आम्हाला पाच मिनिटेही पुरेशी आहेत, इतक्या लवकर आमची बोलणी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.




























































