
सामना प्रतिनिधी, मुंबई
मुंबईला पाणीपुरवठा होणाऱया तलाव क्षेत्रात सध्या धुवांधार पाऊस सुरू असून सात तलावांत 80 टक्क्यांवर पाणीसाठा जमा झाला आहे. तलावांत 11,30,090 दशलक्ष लिटर पाणी जमा असून हे पाणी 310 दिवस म्हणजेच 3 जूनपर्यंत पुरणारे आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही खूशखबर आहे.
मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3650 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मुंबईकरांना वर्षभर पुरेसे पाणी मिळण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी सातही धरणांत मिळून 14,47,363 दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्यक असते. मात्र गेल्या वर्षी तलाव क्षेत्रात परतीच्या पावसाने पाठ फिरवली. यातच या वर्षी पूर्ण जून महिनाही कोरडा गेल्याने मुंबईकरांवर पाणीपुरवठय़ाचे संकट उभे ठाकले होते, मात्र जुलैच्या सुरुवातीपासूनच तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने 29 जुलै रोजी सकाळी 6 वाजता सातही तलावांत मिळून 78.08 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. यातच दिवसभर झालेल्या जोरदार पावसामुळे तलावांत 80 टक्क्यांवर पाणीसाठा जमा झाला आहे. दरम्यान, नोव्हेंबरपासून सुरू केलेली 10 टक्के पाणीकपात रद्द केली असताना जुलै संपण्याआधीच 80 टक्के पाणीसाठा जमा झाल्याने मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार आहे.
एकाच महिन्यात 80 टक्के पाणीसाठा जमा
पाऊस उशिरा सुरू झाल्याने मुंबईकरांना पाण्याची चिंता होती, मात्र 28 जूनपासून 29 जुलै या एका महिन्याच्या पावसातच 80 टक्के पाणीसाठा जमा झाला. मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱया तलावांपैकी तुळशी तलाव 12 जुलै रोजी, तानसा 25 जुलै रोजी तर मोडकसागर 26 जुलै रोजी ओव्हरफ्लो झाला आहे.
29 जुलैचा पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
तलाव पाणीसाठा
अप्पर वैतरणा 56,410
मोडकसागर 1,28,925
तानसा 1,44,122
मध्य वैतरणा 1,89,031
भातसा 5,78,296
विहार 25,260
तुळशी 8,046
एकूण 11,30,090
























































