BREAKING : पृथ्वी शॉ डोपिंगमध्ये अडकला, बीसीसीआयकडून निलंबनाची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा युवा खेळाडू मुंबईकर पृथ्वी शॉ डोपिंग अडकला आहे. डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळल्याने पृथ्वीवर कारवाई करण्यात आली आहे. पृथ्वी शॉ याला आठ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले असून 15 नोव्हेंबरपर्यंत तो एकही क्रिकेट सामना खेळी शकणार नाही. यामुळे टीम इंडियाकडून आगामी दौऱ्यात खेळण्याच्या पृथ्वीच्या आशा मावळल्या आहेत.

कफ सिरप घेत असताना त्यातून नकळत पृथ्वीच्या शरीरात उत्तेजक द्रव्य गेले. या प्रकरणी वाडा संघटनेच्या नियमानुसार पृथ्वी दोषी आढळला. त्यामुळे 8 महिन्यांसाठी त्याला निलंबित करण्यात आल्याचे बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे.

सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेदरम्यान पृथ्वीच्या लघवीचा नमुना घेण्यात आला. 22 फेब्रुवारी 2019 रोजी इंदूरमध्ये ही चाचणी घेण्यात आली. यातून पृथ्वीच्या शरीरात टर्ब्युटलाइन असल्याचे निष्पन्न झाले. टर्ब्युटलाइनचा समावेश वाडानं प्रतिबंधित द्रव्यांमध्ये केला आहे. यानंतर बीसीसीआयने उत्तेजक द्रव्यविरोधी नियमांतर्गत पृथ्वीवर कारवाई केली आहे.

दरम्यान, पृथ्वीने बीसीसीआयला याप्रकरणी स्पष्टीकरण दिले असून माझ्या हातून जाणूनबुजून हे कृत्य घडले नसल्याचे सांगतिले. कफ सिरप घेताना उत्तेजकद्रव्य माझ्या शरीरात गेले, असे पृथ्वी आपली बाजू मांडताना म्हणाला. मात्र नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआयनं पृथ्वीला 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत निलंबित केले आहे.