
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभेपाठोपाठ बुधवारी राज्यसभेतही तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाले. यामुळे देशातून मुस्लिम समाजातील तत्काळ तिहेरी तलाक देण्याची प्रथा हद्दपार झाली असून हा ऐतिहासिक निर्णय आहे. विधेयकाच्या बाजूने 99 मते तर विरोधात 84 मते पडली. फौजदारी गुह्यांच्या तरतुदींना आक्षेप घेत काँग्रेसने विधेयकाला विरोध केला. जदयु, अण्णा द्रमुकने विरोध करीत सभात्याग केला. बिजू जनता दलाने मात्र पाठिंबा दिला.
शुक्रवारी (दि. 23) तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर झाले होते. मात्र राज्यसभेत ‘एनडीए’चे बहुमत नसल्याने विधेयकाचे भवितव्य काय होते, पुन्हा फेटाळले जाते की मंजूर होते याकडे देशाचे लक्ष लागले होते. साडेचार तासांच्या चर्चेनंतर राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी मतदान पुकारले. 99 विरुद्ध 84 मतांनी विधेयक मंजूर झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाची कायद्यात रूपांतर होणार आहे.
राज्यसभेत साडेचार तास वादळी चर्चा झाली. चर्चेला उत्तर देताना कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. 1984 मध्ये 400 वर जागा जिंकणारी काँग्रेस लोकसभेच्या 52 जागांपर्यंत खाली का आली? 1984 नंतर काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत बहुमत का मिळाले नाही? याचे आत्मपरिक्षण काँग्रेसने करावे असा टोला प्रसाद यांनी लगावला.
1986 मध्ये शाहबानो प्रकरणात सुप्रिम कोर्टाचा निकाल काँग्रेस सरकारने बदलला. मुस्लिम महिलांना न्याय मिळू दिला नाही. तेव्हापासून काँग्रेसची पडझड सुरू झाली असे प्रसाद म्हणाले. हिंदू पतीने हुंडा घेणे, एकपेक्षा जास्त विवाह करणे हा गुन्हा असून त्याला शिक्षा होते. मग बेकायदेशीररित्या तिहेरी तलाक दिल्यास मुस्लिम पतीला तीन वर्षांची शिक्षा होत असेल तर गैर काहीच नाही. हा मुद्दा धार्मिक नाही तर महिलांच्या आत्मसन्मानाचा आहे, असे प्रसाद यांनी सांगितले. 20 वर इस्लामिक देशात तिहेरी तलाकवर बंदी आणली आहे. मग लोकशाही राष्ट्र असलेल्या हिंदुस्थानने कायदे का बदलू नयेत? असाही सवाल प्रसाद यांनी केला.
विधेयकामागे राजकीय हेतू – आझाद
– हे विधेयक सिलेकट कमिटीकडे पाठवावे अशी मागणी काँग्रेसने केली. त्यावर मतदान घेण्यात आले. 100 विरुद्ध 84 मतांनी काँग्रेसची दुरुस्ती फेटाळली.
– विधेयक आणण्यामागे सरकारचा हेतू राजकीय आहे. विधेयकामुळे मुस्लिम कुटुंबे उद्ध्वस्त होतील. कुटुंबांमध्ये भांडणे लागतील. तिहेरी तलाकचा गुन्हा फौजदारी न करता दिवाणी स्वरूपाचा करावा. सरकार सिलेकट कमिटीकडे विधेयक पाठवत नसल्यामुळे विधेयकाविरुद्ध मतदान करावे लागत आहे असे आझाद म्हणाले.
अजामीनपात्र गुन्हा; तीन वर्षे कारावास
मुस्लिम पतीने आपल्या पत्नीला तत्काळ तिहेरी तलाक देणे फौजदारी गुन्हा ठरणार आहे. दोषी पतीला तीन वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद यामध्ये आहे.
शरद पवार, पटेल अनुपस्थित; जदयु, अण्णा द्रमुकचा सभात्याग
– 242 संख्याबळ असलेल्या राज्यसभेत ‘एनडीए’चे 107 खासदार आहेत. विधेयक मंजूर होण्यासाठी 122 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो.
– राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल अनुपस्थितीत होते. तसेच सपा, बसपा, तेलंगणा राष्ट्र समिती आणि वायएसआर काँग्रेसचेही काही खासदार गैरहजर राहिले. जदयु आणि अण्णा द्रमुक या ‘एनडीए’तील घटक पक्षाच्या खासदारांनी विधेयकाला विरोध करीत सभात्याग केला. या घडामोडींमुळे विधेयक मंजूर होण्यासाठी आवश्यक असणारे संख्याबळ खाली आले.
हा कोटय़वधी मुस्लिम माता-भगिनींचा विजय आहे. त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे. – पंतप्रधान

























































