
सामना प्रतिनिधी । मनमाड
मनमाड शहर आणि परिसरात पुरेसा पाऊस पडला नसला तरीही या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दिंडोरी तालुक्यातील पालखेड, करंजवण आणि वाघाड या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे ही तीनही धरणे ओव्हरफ्लो झाली असून आता मनमाड शहराची तहान भागणार आहे.
दिंडोरी तालुक्यात कोलवण, धामण, उनंदा या नद्यांच्या पातळीत वाढ झाल्याने पालखेड धरणाची पातळी 600 दलघफूट झाली आहे. धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून दोन दिवसांपासून तेथून 4700 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे ओव्हरफ्लोचे पाणी पालखेड कालव्यात सोडण्यात आल्याने परिसरातील निफाडसह पाटोदा, येवला 38 गाव, येवला व मनमाड शहर तसेच मनमाड रेल्वे या सर्वांना बोनस स्वरूपात मोठय़ा पाण्याचा साठा मिळणे सुरू आहे.
पालखेडचे रोटेशन मिळण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपूर्वी मनमाड व येवलेकरांना शासन दरबारी टाहो फोडावा लागला होता. मनमाडला तर हे रोटेशन न मिळाल्याने सुमारे 35 दिवसांआड नगरपालिकेला पाणीपुरवठा करावा लागला होता. मात्र निसर्गाच्या कृपेने कोणतीही मागणी न करता अचानक पालखेड कालव्यातून मोठय़ा प्रमाणावर पूर पाणी बोनस स्वरूपात मिळाल्याने या सर्वच भागांतील शेतकरी व नागरिक सुखावले आहेत.
मनमाड शहराला भरपावसाळय़ात आजही 17 ते 18 दिवसांआड जेमतेम एक ते दोन तास नगरपालिकेतर्फे नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. शहर व परिसरात पुरेसा पाऊस अद्यापही झालेला नाही. वाघदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रांतही अद्याप पुरेसा पाऊस नसल्याने धरणांमध्ये मृतसाठय़ासह जेमतेम 15 ते 20 टक्के साठा शिल्लक आहे. त्यामुळे सध्या पालखेडचे पाणी पाटोदा तलावातून 270 अश्वशक्तीचे तीन तर 250 अश्वशक्तीचा एक यातून वाघदर्डी धरणात सोडून घेण्यात येत आहे. तेथे साठा करून तो मनमाड शहराला पुरवता येणार आहे. या बोनस साठय़ामुळे किमान सध्या तरी शहराला पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.























































