
सामना प्रतिनिधी । मुंबई
पालिकेच्या शिक्षण खात्याकडून 2007 मध्ये सुरू झालेल्या एमपीएस (म्युनिसिपल पब्लिक स्कूल) मधील पार्ट टाईम शिक्षकांना अद्याप सेवेत कायम करण्यात आलेले नाही. त्यांच्याकडून पाच हजारांच्या वेतनात काम करून घेतले जाते. मात्र तुटपुंज्या मानधनामुळे या शिक्षकांची आर्थिक कोंडी होत असून या शिक्षकांना पालिकेने सेवेत पूर्णवेळ सामावून घ्यावे आणि वेतनवाढ करावी अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.
पालिकेने 2007 मध्ये सुरू केलेल्या एमपीएस शाळांमध्ये केजी ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते. या शाळांमध्ये सुरुवातीला 66 पार्ट टाईम शिक्षकांची नियुक्ती केली होती. यातील अनेक शिक्षक नोकरी सोडून गेले असून 16 शिक्षक आजही सेवेत आहेत.



























































