
सामना प्रतिनिधी । मुक्रमाबाद
खरी पूजा करायची असेल तर दीनदुबळ्यांसह शेतकऱ्याची सेवा करा, असे माझे आजोबा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले आहे. यासाठी मी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
लोकसभा निवडणुकीत ज्यांनी शिवसेना पक्षाला मतदान केले, अशा मतदार बांधवांचे आभार मानण्यासाठी मुक्रमाबाद येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी सचिन अहिर, संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, आमदार सुभाष साबणे, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. उदगीर येथील कार्यक्रम आटोपून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे मुक्रमाबाद शहरात आगमन होताच ढोलताशा, लेझीम पथक व महिला डोक्यावर कलश घेऊन सभामंडपापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली.
गतवर्षीचा पीक विमा शेतकऱ्याना मिळण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रयत्न करीत आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. पाऊस असतानादेखील मोठ्या संख्येने शेतकऱ्यासह नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वितेसाठी शिवसेनेचे बालाजी पा. कबनूरकर, बालाजी पसरगे, मनोज जाधव, अतुल सुनेवाड, राहुल इंदुरे, राजरत्न गुमडे, विजय शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
आदित्य ठाकरेंचा व्यापाऱ्याशी संवाद
नांदेड : 2 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता युवासेनाप्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे नांदेड शहरातील व्यापारीबांधवांशी उत्सव बॅक्वेट हॉल येथे संवाद साधणार आहेत. तसेच त्यांच्या हस्ते सकाळी शिवसेनेच्या वजिराबाद येथील कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. मोहनपुरा येथील पुलाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होणार आहे. नांदेड उत्तर, दक्षिण भागात कृतज्ञता सोहळा व शेतकरी मेळावा होईल. लोहा येथे दुपारी बारा वाजता पोलीस ठाण्यासमोरील मैदानावर विजय संकल्प सभेस आदित्य ठाकरे संबोधित करतील.

























































