
सामना प्रतिनिधी । परभणी
येथील जिंतूर रोडवरील नूतन विद्यालयाच्या प्रांगणात भव्य मंडप उभारण्यात आला असून दीड हजार दिव्यांगांना कृत्रिम अवयव व साहित्यांचे मोफत वाटप आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून संयोजक तथा शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील हे जातीने या कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत. दिव्यांगासाठीचे जवळपास १० ट्रक भरुन साहित्य परभणीत दाखल झाले आहे. याच कार्यक्रमात सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रोजगार महामेळावा आयोजित करण्यात आला आहे आणि त्याचे उद्घाटनही आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
मराठवाडा दुसर्या टप्प्यातील जन आशिर्वाद यात्रेनिमित्ताने शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे परभणी जिल्हा दौर्यावर आले आहेत. आज पालम, गंगाखेड, पोखर्णी नृ. आदी ठिकाणी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. त्यानंतर परभणी शहरात उद्या शनिवार, ३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे रोजगार महामेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. त्यासाठी परभणी येथील जिंतूर रोडवरील नूतन विद्यालयाच्या प्रांगणात भव्य मंडप उभारण्यात आला आहे. सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी हा रोजगार महामेळावा आयोजित केला असून त्यासाठी देशातील अनेक वंâपन्यांच्या अधिकार्यांना परभणी येथे या मेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे परभणी विधानसभा मतदार संघातील तथा जिल्ह्यातील सुशीक्षीत बेरोजगारांनी मोठ्या संख्येने या रोजगार महामेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले आहे.
या रोजगार महामेळाव्यानंतर दीड हजार दिव्यांग व्यक्तींना गरजेनुसार कृत्रिम अवयव साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित युवकांना आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. तरी शिवसेना-युवासेना, महिला आघाडी आणि संलग्न संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले आहे.



























































