आजपासून ट्वेण्टी-20 मालिकेला सुरुवात, हिंदुस्थान-वेस्ट इंडीज आमने-सामने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लॉडरहिल

ऑस्ट्रेलियात 2020 सालामध्ये ट्वेण्टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार असून या मानाच्या स्पर्धेसाठी हिंदुस्थानी संघाने आतापासूनच कंबर कसली आहे. हिंदुस्थान-वेस्ट इंडीज यांच्यामध्ये उद्यापासून क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार असून सुरुवातीला दोन देशांमध्ये तीन ट्वेण्टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर तीन वन डे व दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन देश भिडतील. वर्ल्ड कपनंतर पहिल्यांदाच दोन्ही देश आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

श्रेयस, मनीषला संधी?

वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत ट्वेण्टी-20 वर्ल्ड कपची चाचपणी होणार असल्याचे कर्णधार विराट कोहलीने सांगितल्यामुळे युवा खेळाडूंना ट्वेण्टी-20 व वन डे मालिकेत संधी देण्यात येईल हे जवळपास निश्चित झाले आहे. रोहित शर्मा, शिखर धवन या सलामीवीरांसह विराट कोहली तिसऱया स्थानावर फलंदाजी करील. लोकेश राहुल चौथ्या क्रमांकावर खेळेल. रिषभ पंत यष्टिरक्षक म्हणून संघात असेल. अशा परिस्थितीत हिंदुस्थान अ संघाकडून चमकदार कामगिरी करणाऱया मनीष पांडे व श्रेयस अय्यर या दोघांना संधी मिळेल की नाही हे पाहणे रंजक ठरणार आहे.

मालिका रोमहर्षक होईल : फ्लॉयड रायफर

वेस्ट इंडीज संघात कायरॉन पोलार्ड व सुनील नरीन यांचे पुनरागमन झाले आहे. तसेच या संघात युवा व अनुभवी खेळाडूंचे योग्य मिश्रण आहे. आमचा संघ बलाढय़ हिंदुस्थानी संघाला कडवी टक्कर देईल. आगामी मालिका रोमहर्षक होईल, असे स्पष्ट मत वेस्ट इंडीज संघाचे प्रशिक्षक फ्लॉयड रायफर यांनी लढतीच्या पूर्वसंध्येला व्यक्त केले.

गोलंदाजी विभागात नवे चेहरे दिसणार

जसप्रीत बुमराह व हार्दिक पांडय़ा या स्टार खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे गोलंदाजी विभागात आगामी मालिकेत नवे चेहरे दिसणार आहेत. राहुल चहर, दीपक चहर, नवदीप सैनी या युवा खेळाडूंसह रवींद्र जाडेजा, कृणाल पांडय़ा, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वरकुमार, खलील अहमद या खेळाडूंवर टीम इंडियाच्या गोलंदाजीची मदार असणार आहे.

हिंदुस्थान-वेस्ट इंडीज मालिकेचे वेळापत्रक

पहिली ट्वेण्टी-20 – 3 ऑगस्ट, लॉडरहिल

दुसरी ट्वेण्टी-20 – 4 ऑगस्ट, लॉडरहिल

तिसरी ट्वेण्टी-20 – 6 ऑगस्ट, प्रोव्हिडन्स

(तिन्ही लढती हिंदुस्थानी वेळेनुसार रात्री 8 वाजता)

पहिली वन डे – 8 ऑगस्ट, प्रोव्हिडन्स

दुसरी वन डे – 11 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन

तिसरी वन डे – 14 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन

(तिन्ही लढती हिंदुस्थानी वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता)

पहिली कसोटी – 22 ऑगस्टपासून, नॉर्थ साऊंड

दुसरी कसोटी – 30 ऑगस्टपासून, किंगस्टन

(पहिली लढत सायंकाळी 7 आणि दुसरी लढती रात्री 8 वाजता)