
सामना ऑनलाईन । मुंबई
तीन महिन्यांपूर्वी वाकोल्याच्या मिलिटरी रोड येथे एकाला धडक देऊन पळालेल्या चालकाला अखेर वाकोला पोलिसांनी अटक केली. रियाज अब्दुल माजिद सय्यद असे त्याचे नाव आहे. अपघातानंतर तो गावाला पळून गेला होता.
29 एप्रिल रोजी सायंकाळी वाकोला मिलिटरी रोड येथे एकजण रस्ता ओलांडत होता. वाहनाने धडक दिल्याने तो जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच वाकोला पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी जखमीला रुग्णालयात नेले, मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. अपघाताप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निशांत धुरी आणि पथकाने तपास सुरू केला. या पथकाने रियाजची माहिती काढली. त्याच्या घरच्या पत्त्यावर पोलीस गेले मात्र तो मिळत नव्हता. पोलिसांनी काही चालकांची चौकशी केली. चौकशीत रियाज हा वाकोला परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून रियाजला अटक केली. कारवाईच्या भीतीने तो गावी गेला होता. 15 दिवसांपूर्वीच तो गावावरून मुंबईत आला होता. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.
100 नंबरी जुळवजुळव
अपघातानंतर पोलिसांनी तीन ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली त्यात त्या वाहनाचा सुरुवातीचा नंबर दिसत होता. वाहनाचा मधला आणि शेवटचा असे 100 नंबरांची जुळवाजुळव केल्यानंतर पोलिसांना त्या वाहनाचा नंबर मिळाला.




























































