संकट अमरनाथ यात्रेवर,मग गुलमर्गमधील हॉटेल रिकामी का करताय ? ओमर अब्दुल्लांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, श्रीनगर

केंद्रीय गृहमंत्रालयाने दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेता अमरनाथ यात्रा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. गृहमंत्रालयाने यात्रेकरून माघारी परतण्याचे आवाहन केले आहे. यानंतर आता गुलमर्ग आणि पहलगाममधील पर्यटकांना हॉटेल सोडण्याचे आदेश दिले असल्याचा आरोप नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे. या दोन प्रसिद्ध पर्यटनस्थळी राहणाऱ्या पर्यटकांना माघारी नेण्यासाठी बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आल्याचं अब्दुल्ला यांचे म्हणणे आहे. त्यांनी एका ट्विटद्वारे हा आरोप केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की “अमरनाथ यात्रेवर संकट असेल तर गुलमर्ग का रिकामे केले जात आहे? “

पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून हल्ले होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ यात्रा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधी राज्यपालांच्या प्रशासनाने एक ऍडव्हायजरी जारी केली असून, यात्रेकरूंबरोबरच पर्यटकांनीही तत्काळ कश्मीर खोरे सोडावे अशी सूचना केली आहे. खोऱ्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या वर्षी 1 जुलैपासून सुरू झालेली अमरनाथ यात्रा 15 ऑगस्टपर्यंत चालणार होती. मात्र, गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून यात्रेकरूंवर हल्ले होण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रा 13 दिवस आधीच रोखण्याचा निर्णय घेतला आहे. ही यात्रा थांबवण्याचा घेतलेला निर्णय आणि कश्मीर खोऱ्यात मोठ्याप्रमाणावर सैनिकांची नियुक्ती केली जाणं यामागचं कारण आपल्याला कळत नसल्याचे अब्दुल्ला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. कश्मीर खोऱ्यातील राजकारण्यांना या हालचालींमागे कलम 35 अ रद्द करणे हे मुख्य कारण असल्याचा संशय येत आहे.