
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
नाशिक जिल्ह्यातील धरण परिक्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून दमदार पाऊस सुरू आहे. नांदुरमधमेश्वर बंधार्यातून जवळपास 1 लाख पेक्षा जास्त क्युसेस वेगाने पाणी गोदावरी नदी पत्रात सोडल्याने गोदावरी नदीला यावर्षीचा मोठा पूर आला आहे. प्रशासनाने गोदावरी तीरानजिक असलेल्या 30 गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शहरातून जाणारा गोदावरी नदीवरील लहान पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
तहसील तसेच पोलीस प्रशासनाने नागरिकांना ध्वनी क्षेपकावरून सावधानतेचा इशारा देण्यात येत होता. हे पाणी पाहण्यासाठी नागरिक, महिला तरुण यांनी मोठी गर्दी केली आहे. अनेकांनी या पाण्याचे जलपूजन केले. सेल्फी घेण्यासाठी अनेकांनी मोठी गर्दी केली होती. गंगापूर धरण 90 टक्के, दारणा 88 टक्के तर मुकणे 65 टक्के भरले आहे. गेल्या चौवीस तासांत पडलेला पाऊस व आजपर्यंत एकूण पडलेला पाऊस मिमी मध्ये असा नाशिक 32 -857,त्रंबकेश्वर 164 -2160 ,घोटी 129-1174 ,इगतपुरी 221-3052 ,मध्यमेश्वर 10-276 ,देवगाव 2-289 ,ब्राम्हणगाव 3 -342 ,कोपरगाव 1 -367 ,पढेगाव निरंक -227
दरम्यान नांदुरमधमेश्वर धरणातून 83773 क्युसेक्स पाणी सोडले असून ते रात्रीतून वाढून एक लाखापेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. गंगापूरमधून १७७४८ गौतमी गोदावरी 6225,आनंदी 687, दारणा 23192, भावली 1509,वालदेवी 502 ,पालखेड 6307 ,चणकापूर 7307 ,पुनद 2895 ,हरणबारी 56 ,होळकर पूल 14971 कुसेस वेगाने सध्या विसर्ग सुरु असल्याचे पाटबंधारे खात्याच्या विभागतर्फे सांगण्यात आले. कोपरगांवात आज दिवसभर ढगाळ वातावरण होते अधुनमधुन पावसाच्या तुरळक सरी कोसळत होत्या. प्रशासनाने सतर्कतेचा आदेश केल्यानंतर गोदावरी नदीकाठच्या वसाहतींना पुराचा धोका लक्षात घेता नागरीकांनी स्थलांतर करीत आहेत.त्यासाठी संभाव्य धोका लक्षात घेवून प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यांनी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.
– एकीकडे नदीला मोठ्या प्रमाणावर पूर दिसत असताना गोदावरी नदीतून हे पाणी आपल्या डोळ्या देखत जायकवाडी धरणाकडे वाहून जात आहे दोन्ही कालवे मात्र कोरडे आहेत ते तातडीने प्रवहीत करावे म्हणून नागरिक शेतकरी यांच्याकडून मागणी होत आहे. आमदार स्नेहलता कोल्हे यांनी नाशिक पाटबंधारे विभागाचे मुख्य अधीक्षक राजेद्र मोरे यांच्याशी भ्रमणध्वनिवरून सातत्याने संपर्क करून कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी केली असता त्यांनी डावा व उजवा कालवा सोडण्यात येणार असल्याची माहिती कोल्हे यांनी पत्रकारांना दिली.


























































