
सामना प्रतिनिधी, जयसिंगपूर
कोल्हापुरातील राधानगरी, कोयना, चांदोली अशा तीनही धरणांतून पाणी सोडण्यात आल्याने शिरोळ तालुक्यात महापूर आला आहे. कृष्णा, पंचगंगा, वारणा नदीकाठची असंख्य गावे जलमय झाली आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सांगली-कोल्हापूर नवीन बायपास रस्त्यावर आलेल्या पाण्यात एक अख्खा कंटेनर बुडाला. सांगली-कोल्हापूर मुख्य राज्यमार्गावरही आता पाणी येण्यास सुरुवात झाल्याने कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
2005 मध्ये आलेल्या महापुरामध्ये मिरज-कोल्हापूर दरम्यानच्या कृष्णा नदीवरील रेल्वेच्या पुलाच्या कठड्यांना जेथपर्यंत पाणी आले होते, तेथून आता पाणी केवळ आठ फुटांवर आहे. त्यामुळे उदगाव, अंकली या दोन गावांमध्ये सखल भागात पाणी शिरले आहे. याशिवाय वारणा नदीकाठावरील दानोळीसह अन्य गावांतही पाणी शिरल्याने येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. कृष्णा नदीकाठावरील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथेही रात्रीपासून गावात पाणी येण्यास सुरुवात झाली. येथील अनेक कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे. कर्नाटकातील प्रचंड मोठ्या क्षमतेच्या अलमट्टी धरणातून जोवर मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जाणार नाही, तोवर नृसिंहवाडी व नदीकाठापलीकडील सात गावांमधून महापूर हटणार नाही. मात्र, कर्नाटक सरकार अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याचा केवळ दिखावाच करीत आहे, असा आरोप येथील नागरिक सागर धनवडे यांनी केला.
कृष्णा नदीकाठावरील जयसिंगपूरला पाणीपुरवठा करणारे सुमारे 100 फुटी दोन जॅकवेल पाण्यात बुडाले आहेत. आजूबाजूच्या शेतांमध्ये पाणी शिरले आहे. सांगली-कोल्हापूर मुख्य राज्यमार्गानजीक असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळही पाणी आले आहे. येथून हा मार्ग केवळ पाच फुटांवर आहे. त्यामुळे लवकरच या रस्त्यावर पाणी येऊन हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता आहे.





























































