
सामना ऑनलाईन । मुंबई
सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे शिक्षण सक्तीचे करावे, या मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी याबाबतच्या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती जाहीर केली. या समितीत मराठी भाषामंत्री, शालेय शिक्षण मंत्री, शिक्षण व मराठी भाषा विभाग यांचे प्रधान सचिव यांच्यासह मधु मंगेश कर्णिक, कौतिकराव ठाले पाटील, लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. रंगनाथ पठारे, डॉ. रेणू दांडेकर, रमेश पानसे, दादा गोरे, रमेश कीर, श्रीमती विभावरी दामले व सुधीर देसाई या मान्यवर साहित्यिकांचा आणि शिक्षण तज्ज्ञांचा समावेश आहे, अशी माहिती तावडे यांनी दिली.
ही समिती ‘सर्व प्रकारच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य’ करण्याबाबत सकारात्मक चर्चा आणि विचारविनिमय करुन लवकरात लवकर संबंधित कायद्याचा प्राथमिक मसुदा तयार करेल. हा मसुदा तयार करताना अन्य राज्यांतील स्थानिक, प्रादेशिक भाषांचे शिक्षण याचाही सखोल अभ्यास करण्यात येईल. त्यानंतर हा शासनाचा अधिकृत मसुदा शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला जाईल. त्यावर नागरिकांच्या सूचना/अभिप्राय/हरकती मागविण्यात येतील, अशी माहिती तावडे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
‘मराठीच्या भल्यासाठी’ या व्यासपीठाच्या अंतर्गत 24 साहित्यिक आणि मराठीप्रेमी संस्थांनी मराठीच्या विकासासाठी काही मागण्या शासनासमोर ठेवल्या. शासन या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत आहे. पावसाळी अधिवेशन सुरु असताना मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्राचे मराठी भाषामंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत 24 जून रोजी बैठक झाली. या बैठकीत साहित्यिक व मराठीप्रेमी संस्थांच्या शिष्टमंडळातील प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच 19 जुलै 2019 रोजीही विनोद तावडे व आशिष शेलार यांनी साहित्यिकांच्या शिष्टमंडळाशी पुढील प्रक्रियेबाबत चर्चा केली. या दोन्ही बैठकांमध्ये मराठीची सक्ती या विषयासह शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीचा विकास, मराठी शाळांचे सक्षमीकरण, मराठी भाषा भवन आणि मराठीला अभिजात दर्जा या विषयांवरही चर्चा झाली, अशी माहिती तावडे यांनी दिली. मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार सकारात्मक काम करत आहे, यापुढेही सकारात्मक निर्णय घेण्यास कटिबध्द आहे, असे तावडे यांनी स्पष्ट केले. मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या संबंधित मसुद्यावर नागरिकांनी सूचना/हरकती पाठवाव्यात, असे आवाहनही त्यांनी पत्रकाद्वारे केले आहे.























































