उन्नाव बलात्कार प्रकरण पीडिता व्हेंटिलेटरवर; प्रकृती गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

 लखनौमधून सोमवारी एअरलिफ्ट करण्यात आलेली उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेची प्रकृती गंभीर असून तिला जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे, असे  एम्समधील डॉक्टरांनी सांगितले.

लखनौमधून पीडितेला एअरलिफ्ट केल्यानंतर दिल्लीतील वाहतुकीत रुग्णवाहिका अडकून पडू नये म्हणून दिल्ली वाहतूक पोलिसांनी ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला. त्यामुळे तिला थेट इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थेट एम्समधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. ‘तिची प्रकृती गंभीर असून तिचा रक्तदाबही कमी झाला आहे. तिच्यावर जाणकार डॉक्टरांचे पथक उपचार करत आहे,’ अशी माहिती एम्सच्या ट्रॉमा सेंटरचे प्रमुख डॉ. राजेश मल्होत्रा यांनी दिली.

स्टेटस रिपोर्ट सादर करा! 

पीडिता, तिचे कुटुंब आणि साक्षीदारांच्या सुरक्षेसाठी काय पावले उचलली आहेत, याचा अहवाल सादर करावा, असा आदेश दिल्ली सत्र न्यायालयाने सीबीआयला दिला आहे. त्याचबरोबर पीडितेच्या कुटुंबीयांच्या दिल्लीत राहण्याची काय व्यवस्था केली आहे, याची माहितीही देण्यास सांगितले. दिल्लीच्या सत्र न्यायालयात या खटल्याची आता नियमित सुनावणी सुरू झाली आहे.

जखमी वकीलही एअरलिफ्टने दिल्लीत 

उन्नाव बलात्कार पीडितेच्या जखमी वकिलालाही लखनौमधून एअरलिफ्ट करून मंगळवारी दिल्लीत उपचारासाठी आणले गेले. बलात्कार पीडितेची बाजू मांडणाऱया वकील आणि पीडितेवर ट्रक घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न आरोपींकडून करण्यात आला. मात्र, यात पीडिता आणि तिचा वकील गंभीर जखमी झाले. सर्वोच्च न्यायालयाने याची गंभीर दखल त्यांना एअरलिफ्ट करून उपचारासाठी दिल्लीतल्या एम्समध्ये आणण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर  पीडितेला व तिच्या जखमी वकिलाला दिल्लीत आणण्यात आले. अपघातात गंभीर झालेल्या वकिलाची प्रकृती गंभीर असून तो कोमात आहे.