
सामना ऑनलाईन, मुंबई
रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना आणखी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. रेपो रेटमध्ये 35 बेसिस पॉईंटची कपात करण्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने केली आहे. या घोषणेनंतर आता रेपो रेट 5.40% इतका झाला आहे. रेपो रेट कमी झाल्याने गृह कर्ज, वाहन कर्ज आणखी स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता बँका हा लाभ ग्राहकांना केव्हा देतात याकडे कर्जदारांचे लक्ष असेल. सलग चौथ्यांदा रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमधअये कपात केली आहे. चारवेळा या दरात कपात करत आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने रेपो रेट 1.10 टक्क्यांनी कमी केला आहे. या कपातीचा लाभ बँकांनी ग्राहकांना मिळवून द्यावा असे आवाहन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले आहे.
यापूर्वीच्या सलग तीन द्विमासिक पतधोरणात प्रत्येकी पाव टक्का दर कपात केल्यानंतर रिझर्व्ह बँक चौथ्यांदा हा दर कमी करण्याचा निर्णय घेईल अशी आधीपासून शक्यता वर्तवण्यात येत होती. पतधोरण समितीच्या सदस्यांपैकी 4 सदस्यांनी रेपो दरात 0.35 टक्के कपात करण्याच्या बाजूने मतदान केले. तर दोन सदस्यांनी 0.25 टक्क्यांनी कपात करण्याच्या बाजूने मतदान केले. सप्टेंबरपर्यंत महागाईचा दर हा 3.1 टक्क्यांपर्यंत ठेवण्याचे लक्ष्य रिझर्व्ह बँकेने ठेवले आहे.
Reserve Bank of India (RBI) cuts Repo Rate by 35 basis points to 5.40%. Reverse Repo rate at 5.15% pic.twitter.com/bNvRNLdh1H
— ANI (@ANI) August 7, 2019
गृहनिर्माण क्षेत्र तसेच वाहन निर्मिती क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे. रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे या क्षेत्रांना उभारी मिळण्यास मदत होईल असा अंदाज आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची बैठक बुधवारी मुंबईत पार पडली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये देशातील आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.


























































