
सामना ऑनलाईन, मुंबई
स्टाफ सिलेक्शन परीक्षेत कॉपीचा प्रयत्न करणाऱ्या हरयाणातील अकरा जणांना पवई पोलिसांनी अटक केली. कॉपी करण्यासाठी लागणारे ब्ल्यू टूथ कॉलर डिवाईस आणि मायक्रोफोन पोलिसांनी जप्त केले आहेत.
पवईच्या ऑरम आयटी पार्कमध्ये स्टाफ सिलेक्शनसाठी आज परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेकरिता 1 हजार 870 विद्यार्थी आले होते. परीक्षा केंद्रात जाणाऱ्या उमेदवारांना इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास बंदी केली होती. विद्यार्थ्यांची मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करून त्यांना परीक्षेसाठी आत सोडले जात होते. दुसऱ्या मजल्यावरच्या वर्गात बसलेल्या प्रदीपकुमार ओम्प्रकाश या विद्यार्थ्याकडे ब्ल्यू टूथ कॉलर डिवाईस सापडला. त्यानंतर दहा विद्यार्थ्यांकडून कॉलर डिवाईस आणि मायक्रो फोन मिळाले. एकाच वेळी अकरा विद्यार्थ्यांकडे डिवाईस सापडल्याने एकच खळबळ उडाली. याची माहिती पवई पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी या विद्यार्थ्यांना चौकशीकरिता ताब्यात घेतले. केतन चव्हाण यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच त्या अकरा जणांना पोलिसांनी अटक केली. त्या सर्वाना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
अकरा डिवाईस आणि 10 सिमकार्ड जप्त
अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी छातीवर, काहींनी शर्टाच्या आत तर काहींनी कानात डिवाईस लवपले होते. ऑनलाइन परीक्षा सुरू झाल्यावर ते डिवाईसचा वापर करणार होते. डिवाईसवरून संपर्क करत ते उत्तरे लिहिणार होते. पण ते डिवाईस कसे वापरायचे हे त्या विद्यार्थ्यांना माहीतच नव्हते. एका व्यक्तीने ते डिवाईस दिल्याचे समजते.























































