
सामना ऑनलाईन । मुंबई
पदवी परीक्षांचे निकाल जाहीर करून दीड महिना उलटल्यानंतरही मुंबई विद्यापीठाच्या निष्काळजीपणामुळे अद्याप विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्यामुळे हजारो विद्यार्थी विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित आहेत. गुणपत्रिकाच हाती न आल्याने प्रवेश कसा घेणार असा प्रश्न त्यांना पडला आहे.
पदवी परीक्षांचे निकाल जाहीर केल्यानंतर पंधरा दिवसांत विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका मिळाल्या पाहिजेत, परंतु तीन पंधरवडे उलटले तरी गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. तीन वर्षांच्या विधी अभ्यासक्रमासाठी 25 जुलैपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. 5 ऑगस्ट हा शेवटचा दिवस होता परंतु त्यात 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परीक्षा विभागाने निकाल वेळेत लावला नाही आणि गुणपत्रिकाही दिलेल्या नाहीत. त्यामुळे सीईटी सेललाही विधी प्रवेश प्रक्रिया दीड महिना पुढे ढकलावी लागली. आता प्रवेश कधी होणार, महाविद्यालय सुरू कधी होणार आणि पहिल्या सत्राची परीक्षा कधी होणार असे प्रश्न विद्यार्थ्यांना पडले आहेत.
दरम्यान, युवासेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे दूरस्थ व मुक्त अध्ययन केंद्राने (आयडॉल) वाणिज्य शाखेचे निकाल आज उशिरा जाहीर केले. सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्यामुळे विधी अभ्यासक्रमांना प्रवेश होईल की नाही अशा चिंतेत ते पडले होते. निकाल तातडीने जाहीर करा अशी मागणी युवासेनेने कुलगुरूंकडे केली होती.



























































