
सामना प्रतिनिधी । पारनेर
राज्याच्या विविध भागांतील पुरग्रस्त नागरीकांना पारनेर नगर मतदार संघातील नागरीक तसेच सहकारी कार्यकर्त्यांनी आर्थिक अथवा वस्तू स्वरूपात मदत करण्याचे आवाहन विधानसभेचे उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी केले आहे.
औटी म्हणतात, राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच विदर्भाच्या काही भागात महाप्रलयाने असंख्य गावे वेढली गेली असून, अनेक कुटुंबांचे संसार पुर्णपणे उद्धस्त झालेले आहेत. एक लाखांहून अधिक नागरीकांचे स्थालांतर करावे लागले आहे. पुरग्रस्त नागरीकांच्या घरातील जिवनावष्यक वस्तूही उध्वस्त झालेल्या आहेत. आपण सर्वांनी त्यांना उदार अंतःकरणाने मदत करण्याची आवश्यकता आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरात वास्तव्यास असलेल्या मतदार संघातील नागरीकांसह सार्वांनी मदतीच्या स्वरूपात धनादेश शिवसेना मदत निधी या नावाने तसेच कपडे, औषधे तसेच संसार उपयोगी साहित्य देउन मदतीच्या मोहिमेत सर्वांनी सहभाग नोंदवावा. संकटात सापडलेल्या माणसाला मदत करणे ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. या संस्कृतीचे आपण जतन करू या, त्यांना मोठया प्रमाणात मदत करू या असे विनम्र आवाहन औटी यांनी केले आहे.
पुरग्रस्त भागात अतिशय भयानक परिस्थती निर्माण झाली असून नागरीकांची मदत पारनेर ग्रामिण पतसंस्था तसेच सेनापती बापट मल्टीस्टेट सहकारी पतंस्थांच्या सर्व शाखांमध्ये स्विकारली जाणार असल्याचे जि. प. सदस्य काशिनाथ दाते यांनी सांगितले. वस्तू, संसार उपयोगी साहित्य, रोख रक्कम तसेच धनादेश या शाखांमध्ये स्वीकारले जातील. या मदत कार्यात सहभाग नोंदविण्याचे आवाहन दाते यांनीही केले आहे.



























































