
सामना ऑनलाईन । मुंबई
कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पूरपरिस्थिती भयावह आहे. पूराच्या पाण्यात अजूनही काहीजण अडकले आहेत. त्यामुळे आता या परिस्थितीतून तातडीने मार्ग काढण्याची गरज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. या परिस्थितीला कारणीभूत कोण आहेत, कोणती यत्रंणा कमी पडली आहे, कोणती यत्रंणा सक्षम नाही, यासारखे वाद घालण्यात आता अर्थ नाही आणि वाद घालण्याची ही वेळही नाही. लवकरात लवकर या परिस्थितीतून पूरग्रस्तांना बाहेर काढण्याची गरज आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
पूरग्रस्तांना शिवसेनेकडून सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. आमचे मंत्री एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, शिवसेनेचे खासदार, आमदार यांच्यासह शिवसैनिक पूरग्रस्त भागात मदत कार्य करत आहे. पूरात अडकलेल्या जनतेला सुखरुपपणे बाहेर काढण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. अजूनही काही पूरग्रस्त भागात पोहचण्याचे मार्ग खुले झालेले नाही. त्यामुळे जेथे जाणे शक्य आहे, तिथे पोहचून शिवसेनेकडून मदत कार्याला सुरुवात झाली आहे. पूरग्रस्त भागातून मदतीसाठी संदेश येत असलेल्या ठिकाणी आमचे पथक पोहचत असून बचाव कार्य करण्यात येत आहे. कोण काय करत आहे, यापेक्षा आपण काय करणे गरजेचे आहे, त्यावर आम्ही लक्ष देत आहोत. शिवसेनेकडून जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय सेवा, औषधे, पशूवैद्य पाठवण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथकही रवाना करण्यात आले आहे. पूर ओसरण्यास अजून काही काळ लागण्याची शक्यता आहे. पूर ओसरल्यावर पसरणारी रोगराई रोखण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर असेल. त्यासाठी आम्ही तयारी करत आहोत. या संकटात पशूधन वाचवण्याकडेही लक्ष द्यायला हवे, यासाठी शिवसेनेकडून पशूवैद्यांचे पथक पाठवण्यात आले आहे. आता सगळ्यांनी खंबीरपणे या संकटाचा मुकाबला करण्याची गरज उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
राज्यासह देशातील इतर राज्यातही पूरपरिस्थिती आहे. यात राजकारण न आणता पूरग्रस्त जनतेच्या मागे उभे राहण्याची गरज आहे. राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी की करू नये, या शब्दांत अडकण्यापेक्षा काय करण्याची गरज आहे, याचा विचार करा. कर्नाटकने अलमट्टी धरणातून पाणी सोडले की नाही, कर्नाटक सरकार पाणी सोडत नसेल तर ते सत्यही उघड होईल. मात्र, सध्या आरोप- प्रत्यारोप यात अडकण्यापेक्षा काम करावे, शिवसेनेने आपले काम सुरू केले आहे. इतरांनीही मदत कार्य सुरू करावे, कोकणातही परिस्थिती बिकट आहे. शिवसेना तिथेही शक्य ती मदत करत आहे. वातावरण बदलत आहे. महिन्याभराचा पाऊस दिवसभरात पडत आहे. त्यामुळे यावर तज्ज्ञांनी उपाय योजना सूचवून त्याप्रमाणे काम करण्याची गरज आहे. कोणत्याही वक्तव्याने वादविवाद होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. सर्वांनी वादविवाद राजकारण बाजूला ठेवत पूरग्रस्तांना मदत करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी पूरग्रस्त भागात पाठवण्यात आलेल्या मदतीची माहिती दिली. शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. पूरग्रस्त भागात मदत पोहचणे गरजेचे आहे. पूरग्रस्तांना मदतीची गरज असून शिवसेना त्यांच्या पाठिशी उभी असल्याचे त्यांनी सांगितले. पूर ओसरल्यावर मार्ग खुले होतील, त्याप्रमाणे शिवसेनेचे मदत कार्य करणारे पथक त्या भागात जाणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.





























































