
सामना ऑनलाईन | नवी दिल्ली
सोशल मीडियावर सक्रिय असणारे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांना आणि त्यांच्या मुलीला धमकीचे फोन, मेल आणि मेसेजेस नेटकऱ्यांकडून येत असल्याने ट्विटर अकाऊंट बंद करत असल्याचे त्यांनी सांगितले. बऱ्याचदा ते सरकारच्या सामाजिक प्रश्नांबाबत आपली मत मांडत असल्याचे दिसून येते. देशवासियांना शुभेच्छा देत “जर मी बिनधास्त बोलू शकत नाही तर मी बोलणार नाही. गुड बाय”, असे म्हणत हे माझे शेवटचे ट्वीट असल्याचे कश्यप यांनी सांगितले.
केंद्र सरकारने जम्मू-कश्मीरमधील कलम 370 हटवल्याच्या निर्णयावर अनुराग यांनी ट्वीट केले होते. त्यात मोदी सरकारने कश्मीरबद्दल घेतलेल्या निर्णयावर आपली द्विधा मनस्थिती असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच सरकारने घेतलेल्या निर्णयाची भिती वाटते. कलम 370 आणि कलम 35 अ याबाबतीत जास्त काही बोलू शकत नाही. कारण त्याचा इतिहास आणि तथ्य मी समजू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले होते.
कश्मीर बाबत योग्य आणि अयोग्य असे पैलू आहेत. पण ज्या पद्धतीने सगळे झाले ते बरोबर नव्हते. जनता विचार करते की 120 कोटी लोकांना लाभ कसा मिळेल, हे त्यांना चांगलेच माहिती आहे. असेही त्यांनी म्हटले होते. ते सरळ मोदी सरकारला निशाणा करत होते. त्यानंतर कश्यप सोशल मीडियावर ट्रोल झाले. यामुळे त्यांनी मी कलम 370 समजलो नाही पण कलम हटवले गेले त्याची पद्धत चुकीची होती, असे रिट्विट करून सांगितले. याआधीही पंतप्रधानांना मॉब लिंचिंगबाबत पत्र लिहिण्यावरून ते ट्रोल झाले होते.






























































