इंटरनेटवरील अफवेवर विश्वास ठेवून ठोकले होते भाषण, केंद्रिय मंत्री रमेश पोखरियाल वादाच्या भोवर्‍यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

चरक ऋषींनी अणू–रेणूचा शोध लावला होता. संस्कृत ही वैज्ञानिक भाषा असून भविष्यात बोलणारे कम्प्युटर जर अस्तित्वात आले तर संस्कृतच्या मदतीमुळेच शक्य होईल, असे वक्तव्य करणारे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक चांगलेच वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. मंत्री निशंक यांचा दावा तथ्यहीन असल्याचे आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. हे इंटरनेटवर व्हायरल होणार्‍या अफवांच्या आधारावर केलेले भाषण असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

आयआयटी मुंबईचा 57 वा दीक्षान्त सोहळा शनिवारी पार पडला. या सोहळ्याला रमेश पोखरियाल हे प्रमुख पाहुणे होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोखरियाल निशंक म्हणाले, संस्कृत ही प्रोग्रॅमिंगसाठी सर्वात जास्त वैज्ञानिक भाषा आहे. संस्कृत भाषेतील आज्ञावलीच्या आधारे भविष्यात बोलणारे कम्प्युटर तयार होऊ शकतात असे ‘नासा’ने  म्हटले आहे, अन्यथा कम्प्युटर क्रॅश होऊ शकतात. आपल्या ऋषीमुनींनी अंतराळाबाबत संशोधन केले हे ‘नासा’ने मान्य केलेय.

निशंक पुढे म्हणाले, जगात काहीच नव्हते तेव्हा आपल्याकडे तक्षशिला, नालंदा आणि विक्रमशीला होती.  आर्यभट्टांचे योगदान आपल्याला विसरता येणार नाही. जगाला शून्याची संकल्पना हिंदुस्थानने दिली. सुशृत हा जगातील पहिला शल्यचिकित्सक होता. यापुढे जगात कोठेही नवीन रुग्णालय सुरू होत असेल तर सर्वात आधी आयुष चिकित्सा पद्धतीचा विभाग सुरू केला जातो. नागार्जुन यांनी रसायनशास्त्र्ााची ओळख जगाला करून दिली. मंत्री निशंक यांच्या वक्तव्याचा नेटीजन्सनी समाचार घेतला आहे.

विद्यार्थ्यांना काय वाटतंय

वर्षभरापूर्वी इंटरनेटवर ‘नासा’च्या मिशन संस्कृतबद्दल एक मिथक व्हायरल झाले होते. इंटरनेटवरील या गोष्टींचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया आयआयटी, मुंबईच्या एका विद्यार्थ्याने दिली. सार्वजनिक मंचावर भाषण करण्यापूर्वी ते फॅक्ट चेकरच्या माध्यमातून तपासून घेतले पाहिजे असे ट्विट एका विद्यार्थ्याने केले. भाषणापूर्वी त्यातील मजकूर आणि सत्य तपासले पाहिजे, असे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

काही विद्यार्थ्यांनी मंत्री निशंक यांनी वास्तवाची उजळणी केल्याचे ट्विट केले आहे. ‘वैदिक काळात साधूंनी स्पेस शटलचा शोध लावला होता. ‘नासा’ने अधिकृतरीत्या हे मान्य केले आहे’, असे ट्विट एका युजरने केले आहे.