प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, पावसासाठी साकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परळी वैद्यनाथ

देशात असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी दुसर्‍या श्रावण सोमवार निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केली. सकाळपासूनच भाविक भक्तांनी रांगा लावल्या होत्या. मंदिर परिसर भक्तीमय वातावरणाने फुलून गेला. ऑगस्ट महिना उजेडूनही बीड जिल्ह्यासह पुरेसा पाऊस न झाल्याने भक्तांनी पावसासाठी वैद्यनाथाला साकडे घातल्याचे दिसून आले.

पवित्र अशा श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर परळीत दररोज देशातल्या कानाकोपऱ्यातील भाविक दाखल होत असून आज दुसर्‍या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने वैद्यनाथाच्या नगरीत मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले.काल रविवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासुन दर्शन सुरू झाले होते. धर्मदर्शन रांगेत मध्यरात्री पासूनच भाविकांचा मोठी गर्दी होती. दर्शन पास रांगेतून दर्शनासाठी भाविक दाखल झाले होते. दरम्यान मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला असून वैद्यनाथ भगवान की जय, बम बम भोले असा जयघोष केला गेला. मेरुप्रदक्षिणा करून जगमित्रनागा समाधीदर्शन करण्याची परंपरा परळीत आहे. दुसर्‍या श्रावणी सोमवार निमित्ताने परळीपंचक्रोशीतील विविध गावामधून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेऊन भाविकांनी मेरुप्रदक्षिणा करून आपली वारी पूर्ण केली.