
कृष्णा आणि पंचगंगेचे पाणी ओसरत असल्याने महापुराचा विळखा कमी होत आहे. सांगली, कोल्हापुरात मदतकार्याला वेग आला आहे. मात्र सर्वत्र दुर्गंधी पसरली असून रोगराईची भीती वाढली आहे. त्यातच साप, विंचवांचा सुळसुळाट वाढला आहे. आता स्वच्छतेचे आणि हजारो लोकांचे पुनर्वसन करण्याचे आव्हान आहे. दरम्यान, आज आठव्या दिवशी पुणे-बंगळुरू महामार्गासह अनेक रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले.
– कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या खाली 44 फुटांवर आली आहे.
– सांगली शहरातील स्टेशन चौक, मारुती चौक, कर्नाळ रोड वगळता पुराचे पाणी ओसरले आहे.
– सांगली-जयसिंगपूर रस्ता, आर्यवीन पूल, ईश्वरपूर रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
– शहरात बाजारपेठेसह सर्वत्र चिखल, घाणीचे साम्राज्य आहे. स्वच्छता मोहीम सुरू आहे.
नगर सचिव निलंबित
सांगली शहरात महापूर आला तेव्हा महापालिकेची यंत्रणा कामाला लागली, परंतु नगर सचिव बाळासाहेब मल्लेवाडे आपत्ती केंद्राकडे फिरकले नाहीत. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मल्लेवाडे यांना निलंबित केले आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी ही कारवाई केली.
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका सरसावल्या
सांगली शहरात स्वच्छतेचे आव्हान आहे. स्वच्छतेसाठी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेसह काही नगरपालिकांची 46 वाहने आणि 655 कर्मचारी मदतीसाठी आले आहेत. सांगली महापालिकेच्या आठशे कर्मचाऱयांनी युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. आयुक्त नितीन कापडणीस स्वच्छतेच्या कामाचे नियोजन करीत आहेत.
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेसह धाराशीव, तासगाव, पाचगणी, लोणावळा, जेजुरी, रहिमतपूर, ईश्वरपूर, कडेगाव, आष्टा, कवठेमहांकाळ, शिराळा, विटा नगरपालिकांचे कर्मचारी आपली वाहने, स्वच्छता यंत्रणेसह आले आहेत. तसेच संत निरंकार मंडळ, निर्धार फाऊंडेशन, उद्योजक, आयुष फाऊंडेशन, टीम विशालसह अनेक स्वयंसेवी संस्था स्वच्छतेच्या कामात सहभागी झाल्या आहेत.
शिरोळमधील अनेक गावे पाण्याखालीच
– कोल्हापूर शहरातील पूर ओसरू लागला असला तरी शिरोळ तालुक्यातील अनेक गावे पाण्याखालीच आहेत.
– शिरोळ तालुक्यातील 42 गावांमधील 40 हजार 452 कुटुंबांतील 1 लाख 62 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. मात्र अजूनही हजारो लोक अडकले आहेत.
– कोल्हापूर शहर परिसरातील पूर ओसरल्याने कोल्हापूर ते सांगली मार्गावरील बस वाहतूक सुरू झाली. उदगावनजीक आठ दिवस पुराचे पाणी राहिल्याने काही ठिकाणी रस्ता खचला.
– हवाई दलाच्या एमआय-17व्ही-5 या हेलिकॉप्टरमधून सात दिवसांत सांगली आणि कोल्हापुरातील पूरग्रस्तांसाठी 40 टन जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यात आली. यात महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या शिरोळ तालुक्यात 24 टन अन्न व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. काही गावांमध्ये एअर ड्रॉपिंगने तर काही ठिकाणी बास्केटच्या माध्यमातून साहित्य पाठवले, अशी माहिती हवाई दलाचे स्क्वॉड्रन लीडर संदीप पवार यांनी दिली.






















































