
शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्रात प्लॅस्टिकबंदी लागू झाली. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणीही होत आहे आणि जनजागृतीही मोठय़ा प्रमाणावर झाली आहे. आता ‘सिंगल यूज’ प्लॅस्टिक देशातून हद्दपार करण्याची गरज असून त्यासाठी संपूर्ण देशात प्लॅस्टिकबंदी कायदा करून कडक अंमलबजावणी करा, अशी मागणी शिवसेना नेते–युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केली.
स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी प्लॅस्टिकचा वापर बंद व्हायला हवा असे सांगत येत्या 2 ऑक्टोबरपासून त्यासाठी मोहीम हाती घेण्यात येईल असे सांगितले होते. त्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मोदी यांचे अभिनंदन केले.
ब्लू स्कॉड सक्रिय होणार
हानीकारक प्लॅस्टिकवर बंदी घालणे ही काळाची गरज आहे, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. प्लॅस्टिकला पर्याय आहे आणि त्यासाठी शिवसेना व युवासेनेच्या वतीने महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वत्र जनजागृती केली जात असून लवकरच बंदी असलेले प्लॅस्टिक वापरणार्यांविरुद्ध कारवाई करणारे ब्लू स्कॉडही सक्रिय होईल असे त्यांनी सांगितले. मुंबईत सर्व शाळांमधून कापडी पिशव्यांचे वितरण केले जात आहे आणि महिला बचत गटांनाही त्यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे असे त्यांनी पुढे सांगितले. या पत्रकार परिषदेला शिवसेना सचिव सूरज चव्हाण, महानगरपालिका आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले आदी उपस्थित होते.
प्लॅस्टिकनिर्मिती, विक्री आणि वापरावर देशव्यापी बंदी हवी
महाराष्ट्रासह देशातील 16 राज्यांमध्ये प्लॅस्टिकबंदी आहे. मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंटस् आणि मोठय़ा दुकानांमध्ये हानीकारक प्लॅस्टिकचा वापर बंद करण्यात आला आहे. आता पंतप्रधानांच्या घोषणेमुळे संपूर्ण देशात ‘सिंगल यूज’ प्लॅस्टिकवर निर्बंध येतील असा विश्वास व्यक्त करतानाच अशा प्लॅस्टिकची निर्मिती, विक्री आणि वापरावर निर्बंध आणले पाहिजेत, असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. प्लॅस्टिकबंदीची कठोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे, असे ते म्हणाले.

























































