
मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात खासगी बस बेकायदेशीरपणे पार्किंग केल्यास आता 15 हजारांचा दंड केला जाणार आहे. यात संबंधित बस चालकाने दुसऱया वेळी नियमबाह्य पार्किंग केल्याचे आढळल्यास बस जप्त केली जाणार आहे. 1 सप्टेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
पालिका क्षेत्रात खासगी बसेससाठी माफक दरात वाहनतळ उपलब्ध असताना अनेक खासगी बसेस रस्त्यावर पार्क केल्या जातात. त्यामुळे रहिवाशी, प्रवाशांसह वाहनचालकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे या बेकायदा बस पार्किंगवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या मार्गदर्शनात झालेल्या आढावा बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईतून बेस्ट बसेस व शालेय बसगाडय़ांना वगळण्यात आले आहे. या बैठकीला मुंबई वीहनतळ प्राधिकरणाचे प्रमुख रमानाथ झा, अतिरिक्त महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, पालिकेच्या वाहनतळापासून 500 मीटरच्या आत बेकायदा पार्किंग केल्यास दहा हजारांपर्यंत दंड करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी 7 जुलैपासून करण्यात आली आहे.
तर गाडीचा होणार लिलाव
ज्या बस गाडीकर एकदा दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी बस पुन्हा अनधिकृतपणे पार्क केल्याचे आढळून आल्यास ती तत्काळ जप्त करण्यात येणार आहे. जप्त केलेल्या या बस गाडीचा संबंधित नियम व पद्धतीच्या अनुसार लिलाव करण्याचेही निर्देश आढावा बैठकीदरम्यान देण्यात आले आहेत.
सध्या अशी आहे व्यवस्था
पालिका क्षेत्रातील वाहतूक अधिकाधिक सुरळीत व गतिमान व्हावी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सक्षम व्हावी यासाठी पालिकेकडून उपाययोजना केल्या जातात. यामध्ये सुमारे साडेतीन हजार बसेस पार्क होऊ शकतील अशा 24 बेस्ट डेपो व 37 बेस्ट टर्मिनलच्या जागांवर अत्यंत माफक दरात वाहनतळ सुविधा या महिन्यापासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र असे असूनही आतापर्यंत केवळ 412 वेळा या सुविधेचा लाभ घेण्यात आला असून अनेक खाजगी बस अजूनही रस्त्यांवर बेकायदेशीरपणे पार्क केल्याचे आढळून येत आहे.





























































