
एसटी महामंडळाने आधुनिकतेकडे आणखीन एक पाऊल टाकले असून अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करीत एसटीच्या १८ हजार बसेसवर व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम बसवण्याचे काम सुरू झाले आहे. या सिस्टममुळे प्रत्येक बसस्थानकावर लावलेल्या टीव्ही सेटवर एसटी बस नक्की किती वाजता येईल, किती वाजता सुटेल याची अद्ययावत माहिती एसटीच्या सुमारे ६७ लाख प्रवाशांना एका क्षणात मिळेल. मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर लोकल किती वाजता आणि किती वेळेत येईल याची माहिती स्टेशनवरच्या डिस्प्ले बोर्डवर झळकते त्याचधर्तीवर एसटी बस येण्याची आणि जाण्याची वेळ बस स्थानकावरच्या पॅसेंजर इन्फर्मेशन सिस्टमद्वारे प्रवाशांना मिळणार आहे.
सार्वजनिक परिवहन सेवेवर व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम व पॅसेंजर इन्फर्मेशन सिस्टम बसवणारे एसटी महामंडळ देशातील दुसरे महामंडळ आहे. यापूर्वी गुजरातमध्ये ही सिस्टम बसवली आहे. पण एवढय़ा व्यापक प्रमाणावर ही सिस्टम बसवणारे एसटी महामंडळ देशातील पहिलेच महामंडळ आहे. या सिस्टमवर महामंडळ तब्बल ३२ कोटी ५५ लाख रुपये खर्च करणार आहे.
परिवहन मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
एसटी महामंडळाच्या २३ बसस्थानकांवर बसवण्यात आलेल्या पॅसेंजर इन्फर्मेशन सिस्टमचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते मंत्रालयातील त्यांच्या दालनातून आज उद्घाटन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात सुमारे ९४५ एसटी बसेसवर व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम बसवण्यात आली आहे. नाशिक विभाग, मुंबई पुणे मुंबई, बोरिवली पुणे बोरिवली व ठाणे पुणे ठाणे या मार्गांवरील शिवनेरी सेवेवरील व्हेइकल टॅकिंग सिस्टम व पॅसेंजर इन्फर्मेशन सिस्टमचे दिवाकर रावते यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
महिनाभरात मोबाईल ऍप
पॅसेंजर इन्फर्मेशन सिस्टम महामंडळाच्या आगारात व प्रत्येक बस थांब्यावर बसवण्यात येणार आहेच, पण पुढील एका महिन्यात ऍपवरही प्रवाशांना ही सोय उपलब्ध होणार आहे. मोबाईलवर ऍप डाऊनलोड केल्यावर प्रत्येक प्रवाशाला त्याच्या मोबाईलवर बस नक्की कुठे आहे. कधी येईल आणि कधी सुटले याची थेट माहिती मिळेल.
प्रवाशांना फायदा
रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या लोकलची अपेक्षित वेळ ज्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स डिस्प्ले बोर्डवर दिसते त्याचधर्तीवर एसटी बस स्थानकांवर लावलेल्या एलईडी टीव्ही सेटसवर प्रत्येक एसटी येण्यासाठी किती वेळ लागेल, किती वाजता सुटेल याची अचूक माहिती प्रवाशांना मिळेल तर व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टममुळे एसटी बस नक्की कोणत्या भागात आहे, वाहतूक कोंडीत अडकली आहे का, वाहनाचा वेग याची अचूक माहिती नियंत्रकाला कंट्रोल रुममध्ये दिसले. त्यानुसार बस चालकाला सूचना दिल्या जातील.























































