
जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने आता ‘आयएसआय’ या गुप्तचर संघटनेकडूनच थेट दहशतवाद्यांची भरती सुरू केली आहे. कश्मीरमधून दहशतवादी कारवाया आणि सीमेवरील घुसखोरी कायम राहावी यासाठी पाकिस्तान पुन्हा मोठय़ा तयारीने दहशतवाद्यांची भरती करू लागला आहे. ‘आयएसआय’ने मुजफ्फराबादच्या बसनाडा तळावर दहशतवाद्यांसाठी प्रशिक्षण सुरू केले आहे. दहशतवादी केंद्रात दाखल झालेल्या तरुणांना अल बदर या दहशतवादी संघटनेकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना लिपा आणि केरन सेक्टरच्या लॉन्चपॅडद्वारे हिंदुस्थानमध्ये घुसखोरीसाठी पाठवले जाणार आहे. बनसाडाबरोबरच पेशावर आणि क्वेटामधील आदिवासी भागांतूनही तरुणांची भरती केली जात आहे. त्याचबरोबर पीओकेतील पूंछ, बाग आणि कोटलीमधूनही तरुणांची भरती दहशतवादी कारवायांसाठी केली जात आहे. मीरपूर आणि सियालकोटमधील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळांवरून 9 ऑगस्टपासून दहशतवाद्यांना अंडर वॉटर ट्रेनिंग सुरू करण्यात आले आहे.






















































