
कलम 370 हटवण्यात आल्यानंतर पंधरा दिवसांत पहिल्यांदाच बारामुल्ला येथे लष्कराची अतिरेक्यांशी चकमक झडली. यात एक अतिरेकी ठार झाला असून एक विशेष पोलीस अधिकारी शहीद झाला आहे.
जम्मू-कश्मीरातून कलम 370 हद्दपार करण्यात आल्यानंतर तेथे शांतता आहे. पंधरा दिवसांत खोऱयात एकही अनुचित प्रकार घडला नाही. आज बारामुल्ला येथे अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर, सीआरपीएफ तसेच स्थानिक पोलिसांनी संयुक्त कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. संपूर्ण परिसराची घेराबंदी करण्यात आली. लष्कराने घेरताच अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. यात ‘लश्कर ए तोयबा’चा मोमीन गोजरी हा अतिरेकी ठार झाला तर विशेष पोलीस अधिकारी बिलाल अहमद हे शहीद झाले. या चकमकीत पोलीस उपनिरीक्षक अमरदीप परिहार हे गंभीर जखमी झाले.
फुटीरतावाद्यांची हिंमतच झाली नाही
कलम 370 हटवण्यापूर्वी अतिरेक्यांना वाचवण्यासाठी फुटीरतावादी रस्त्यावर उतरून लष्करावर दगडफेक करत होते, मात्र आज एकाही फुटीरतावाद्याची दगड उचलण्याची हिंमत झाली नाही. संपूर्ण कारवाई होईपर्यंत परिसरात फिरकण्याचेही धाडस फुटीरतावाद्यांनी केले नाही.



























































