
शाळा प्रवेशात आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवताना अनाथ मुलांच्या कागदपत्रांसाठी काही अडचणी निर्माण होत होत्या. यापुढे अशा अनाथ मुलांवर शाळा प्रवेशात अन्याय होऊ नये म्हणून अनाथालयाची कागदपत्रे ग्राह्य धरून प्रवेश देण्यात यावेत यासह या मुलांसाठी आवश्यक महत्त्वाचे निर्णय आज शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री ऍड. आशीष शेलार यांनी घेतले.
अनाथ मुलांच्या शाळा प्रवेशात कागदपत्रांच्या अनेक अडचणी निर्माण होत होत्या. विशेषतः त्यांचे उत्पन्नाचे दाखले मागितले जात असत तसेच त्यांच्या नावासमोर जात व शेवटचे नाव काय लिहावे याबाबत संभ्रम होता. त्यामधे सुस्पष्टता आणण्यासाठी आज महत्त्वाचा शासन निर्णय जारी करून शिक्षणमंत्री ऍड. आशीष शेलार यांनी या मुलांना मोठा दिलासा दिला आहे.
आरटीई 25 टक्के प्रवेशाकरिता बाल सुधारगृह/अनाथालये मधील विद्यार्थी या संवर्गाचा समावेश करण्यात यावा तशी सुविधा एनआयसी, पुणे यांनी पोर्टलमध्ये उपलब्ध करावी.
बालकांच्या प्रवेशाकरिता अनाथालयाची/बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत.
अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेण्यात येऊ नये.
विद्यार्थ्यांचा पिता/आई यांचे नाव माहीत नसल्याकारणाने मधले नाव या ठिकाणी Not known सुविधा उपलब्ध करावी.
शेवटचे नाव या ठिकाणीसुद्धा Not known सुविधा उपलब्ध असावी.
धर्म माहिती नसल्याने सोबत Not known सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.
Category यामध्ये अनाथ असे नोंदवण्याची सुविधा उपलब्ध असावी.
अनाथ मुले शाळेत प्रवेशानंतर दत्तक गेल्यास दत्तक घेणाऱ्या पालकाचे नाव आडनाव अद्ययावत करण्यासंदर्भात माहिती New entry tab द्वारे उपलब्ध करून देण्यात यावी.





























































