भिवंडीमध्ये 6 वर्ष जुनी इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भिवंडीमध्ये इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. इथल्या मौजे पिरानी पाडा,शांतीनगर नागांव भागामध्ये ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 5 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही इमारत अवघी 6 वर्षे जुनी होती. निकृष्ट बांधकामामुळे ही इमारत कोसळल्याचे सांंगण्यात येत आहे.

ही इमारत 4 माळ्याची होती आणि ती अत्यंत धोकादायक अवस्थेत होती. इथे राहात असलेल्या कुटुंबांना अग्निशमन दलामार्फत इमारतीतून स्थलांतरीत करण्याचं काम सुरू असतानाच ही इमारत कोसळल्याचे कळते आहे. पहाटे 2.10 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या इमारतीमध्ये 8 कुटुंब राहात असल्याची माहिती मिळाली होती ज्यातील काही कुटुंबे आधीच बाहेर काढण्यात आली होती.

या दुर्घटनेत जखमी झालेल्या दोघांची नावे कळाली असून ती अब्दुल अजीज सय्यद मुलाणी (वय-55वर्षे), जावेद सलीम शेख (वय-36वर्षे) अशी आहेत. पोलीस, NDRF आणि TDRF चे जवान, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांचे जवान आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी पहाटेपासूनच बचावकार्य सुरू केले आहे.

भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे आयुक्त अशोक रणखांब यांनी या इमारतीचा काही भाग कोसळू शकतो अशी माहिती मिळाली होती असं सांगितलं आहे. ही माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने इमारतीकडे निघाले असं रणखांब यांनी सांगितले.