राष्ट्रवादीच्या नेत्याची दंडेलशाही मोडली, पोलादपुरातील गावकऱ्यांच्या दारात एसटी पोहोचली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

 

राजकीय दबावाच्या जोरावर रहदारीच्या रस्त्यावरच काँक्रीटची भिंत टाकणाऱया राष्ट्रवादीच्या नेत्याची दंडेलशाही प्रशासनाने मोडीत काढली आहे. पोलादपूरच्या तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी शनिवारी पोलीस बंदोबस्तात कातळी बंगला ते पळचील मार्गावरील ही भिंत जेसीबीने पाडली आहे. त्यामुळे पोलादपुरातील तब्बल पाच हजारांहून अधिक गावकऱयांच्या रहदारीचा मार्ग मोकळा झाला असून बंद झालेली एसटी सेवा आजपासून पुन्हा सुरू झाली आहे.

रायगड जिह्यातील शेवटचे गाव पळचील गावाची ओळख आहे. या गावापासून पुढे रत्नागिरीची म्हणजे खेड तालुक्याची हद्द सुरू होते. पोलादपूर शहरापासून 18 किमी असलेले हे गाव तसे दुर्गम भागात आहे. मात्र या मार्गावरील कातळी बंगला येथे राहणारे राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सुहास मोरे यांनी राजकीय दबाव वापरत थेट जिल्हा परिषदेच्या रस्त्यावरच दगडी कुंपण टाकले होते. नऊ फूट रुंदी असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण केल्याने गेल्या महिनाभरापासून कातळी ते पळचील या 10 किलोमीटर मार्गावरील एसटी सेवा पूर्णपणे खंडित झाली होती. त्यामुळे पोलादपूरहून एसटीने येणाऱया गावकऱयांना नाइलाजाने तंगडतोड करत घर गाठावे लागत होते. पळचील, गोलदरा, तामसडे, महालगूर ग्रामस्थांना याचा फटका बसत होता.

गणेशभक्तांना दिलासा

मोरे यांनी पाच वर्षांपूर्वी दगडी कुंपण टाकून जिल्हा परिषदेचा रस्ता अडवला होता. विशेष म्हणजे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गेल्या वर्षी त्यांनी थेट तेथे काँक्रीटची भिंत टाकल्याने एसटी कातळी बंगला येथूनच वळून पुन्हा पोलादपूरला जात असे. त्यामुळे गावकऱयांना पुढे आठ ते दहा किमी पायपीट करावी लागत होती. मात्र आता हे ‘विघ्न’ दूर झाले असून गणेशोत्सवात गावी जाणाऱया भाविकांनादेखील मोठा दिलासा मिळाला आहे.

उशिरा का होईना प्रशासनाला जाग

बेकायदा कुंपणामुळे अनेकदा एसटी रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांना घासण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत होते. याविरोधात गावकऱयांनी तक्रारी करूनही स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत होते. अखेर उशिरा का होईना जाग आलेल्या अधिकाऱयांनी ‘इन ऍक्शन’ होत काँक्रीटची ही भिंतच तोडून टाकल्याने रहदारीचा मार्ग मोकळा झाला आहे.