
दिघा येथील इलठाण पाडा परिसरात रेल्वेने बांधलेला डॅम आता धोकादायक झाला आहे. त्याची दुरुस्ती आणि डागडुजी करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा डॅम महापालिका प्रशासनाने रेल्वेकडून तातडीने हस्तांतरित करून घ्यावा, अशी मागणी शिवसेनेने महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
नवी मुंबईतील विविध समस्यांबाबत शिवसेना खासदार राजन विचारे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. पालिकेला 30 इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या आहेत. या बसेसचे लोकार्पण केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांच्या प्रमुख उपस्थित आणि लवकरात लवकर पार पडावे. जुईनगर रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल बांधण्यास मंजुरी मिळाली आहे, मात्र ते काम अद्यापही सुरू झालेले नाही, ते तातडीने सुरू करण्यात यावे, ऐरोली येथे गरम मसाला हॉटेलसमोर अपघाताचे प्रमाण वाढले आहे, तिथे भुयारी मार्ग तयार करण्यात यावा आदी मागण्या आयुक्त मिसाळ यांच्याकडे केल्या.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, संतोष घोसाळकर, अतुल कुलकर्णी, उपशहरप्रमुख जितेंद्र कांबळी, प्रदीप वाघमारे, नगरसेवक एम. के. मढवी, काशीनाथ पवार, विसाजी लोके आदी उपस्थित होते.




























































